सांगलीमध्ये पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज
सांगली : सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील 4 हजार 100 लोकांचे तर 3 हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, जिल्हा परिषद यांची पूर आपत्ती आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते, बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, एनडीआरएफ कमांडर सर्वेश कुमार, सैन्य दलाचे मेजर साकेत पांडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, “लोकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही आपल्या सोबत आहोत, मात्र सतर्क राहावे, जेणे करून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. लोकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावे, ९१५ कुटुंबातील ४ हजार १०० लोकांचे स्थलांतर पूर बाधित क्षेत्रातून सुरक्षित स्थळी करण्यात आले आहे. यापैकी ९० टक्के लोक स्वतःच्या नातेवाईकांकडे आहेत, तर उर्वरित लोकांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. ज्या ठिकाणी राहणे, जेवण, औषधोपचार आशा सोयी ठेवण्यात आल्या आहेत”
इशारा पातळी ओलांडली
सांगलीत कृष्णा नदीवर दुपारनंतर पाण्याची पातळी ४० फिटांव र अर्थात इशारा पातळी ओलांडली होती, धरण क्षेत्रात पावसाने जोर कमी केला असला तरी तो अद्याप सांगता येत नसल्याने प्रशासन सतर्क आहे. रविवारी संतगतीने पाणी वाढत असले तरी प्रशासनाकडून दोन फूट पाणी पातळी वाढण्यापूर्वीच लोकांचे स्थलांतर करून घेत आहेत, दरम्यान गत महापुराच्या अनुभवानुसार लोक देखील प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
पूरग्रस्तांनी अधिकृत सुचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले, पुलाच्या ठिकाणी किंवा नदीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने पर्यटनाला किंवा विनाकारण आशा ठिकाणी जाणे टाळावे, जिल्ह्यात याबाबत ३ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी घरफोडीच्या भीतीने घर न सोडण्याची भूमिका घेऊ नये, प्रशासनाने सांगितल्यावर तात्काळ घर सोडावे, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सतर्क असल्याचेही घुगे यांनी सांगितले.
मनपा क्षेत्रात सर्व तयारी
मनपा आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मनपा प्रशासना कडून देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनीपालन करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे तसेच मनपातर्फे निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सैन्य दल, एनडीआरएफ कडून पाहणी
तत्पूर्वी जिल्ह्यात दाखल इंडियन आर्मीची तुकडी, एन. डी. आर. एफ व मनपा अग्निशमन दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतला . सध्या पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. जिल्हा प्रशासन,पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. १०० जवानांची एक तुकडी आपत्ती व्यवस्थापन साहित्यासह सज्ज आहे, तर एनडीआरएफ जवानांची देखील ३२ जणांची एक तुकडी असणार आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांची आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट
सांगली मिरज कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षास आमदार सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन महापालिकेने पूर परिस्थितीबाबत केलेले उपयायोजन व पूर परिस्थितीत केलेले नियोजन या बाबत माहिती घेतली, मनपाच्या कामकाजाबद्दल आमदार गाडगीळ यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या चांगल्या प्रकारे काम करत असून पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासनांशी समन्वय साधून संभाव्य आपत्ती वर आपण नक्की मात करू असे सांगितले.