''...त्यामुळे शरद पवार सुरक्षा घेण्यासाठी सहकार्य असं आम्हाला वाटतं''; मंत्री शंभूराज देसाईंचे वक्तव्य
लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठ सजल्या आहेत. खरेदीसाठी लोक बाजारात गर्दी करत आहेत. दरम्यान राज्य सरकार देखील सणासुदीपूर्वी सुरक्षेचा आणि इतर गोष्टींचा आढावा घेत आहे. दरम्यान कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन आज गणेशोत्सव, शरद पवारांची सुरक्षा, राजकोट किल्ल्यावरील घटना अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. दरम्यान राज्यातील सर्व प्रशासन यंत्रणा या सतर्क झाल्या आहेत. आज सर्व जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे बुजवणे तसेच वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी काळजी घेणे याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, असे उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
पुढे बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ”डोंबिवली येथे वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद राहिल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे. .तेथील कामामुळे जर ही समस्या निर्माण झाली असल्यास काम स्लो डाऊन करण्याच्या किंवा रात्रीच्या वेळी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या त्या रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या असून स्वतः मुख्यमंत्री यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी सुध्दा केली.मी सुद्धा या प्रश्न लक्ष ठेवून असून येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.”
राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय परवानगीने उभारल्या गेलेल्या सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले असून लवकरच याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सीसीटीव्ही लावण्याचे बाबत विशेष उपाययोजना केल्या जात असून ६०० कोटी खर्च करून तब्बल सहा हजार सीसीटीव्ही सातारा जिल्ह्यात लावण्यात येणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवार यांची झेड प्लस सुरक्षा याबाबत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, ”केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे. ती सुरक्षा असलेले शरद पवार एकटेच नेते नाहीत.त्या सुरक्षेचे काही नियम आहेत. ते सर्वांना सारखे असतात .त्याचे काही नियम असतात ते सर्वांना पाळावे लागतात. शरद पवार यांच्या सुरक्षेची काळजी जशी राज्याला आहे तशी केंद्राला आहे. त्यामुळे शरद पवार सुरक्षा घेण्यासाठी सहकार्य करतील असं आम्हाला वाटते. तसेच आगामी निवडणुकीत महायुतीचे विजयी होईल आणि २०० जागा जिंकून सत्तेत येईल.”