आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आता ताकदीने उतरणार
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत दोनशे ते अडीचशे जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. मात्र, नागपूरसह विदर्भात त्यांना इच्छुक उमेदवारही सापडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील पक्ष निरीक्षक रविभवन येथे अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करत आहेत. गुरुवारी नागपूर शहराच्या 6 विधानसभा जागांसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या ‘या’ पक्षाचे भाजपसोबत झाले मतभेद; दौऱ्यालाही केला विरोध
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून केवळ एकाच व्यक्तीने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून, या परिसरात स्वतः केलेल्या कामांची माहितीही दिली आहे. उर्वरित जागांवर एकही नाव पुढे आले नाही. स्थापनेपासून पक्षाला येथे आपले अस्तित्व वाढवता आलेले नाही. प्रत्येक जिल्ह्याची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील 6 जागांसाठी एकही नाव पुढे आले नसल्याची माहितीही पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. या बैठकीला पक्षाचे नेते दिलीप धोत्रे, चंदू लाडे, विशाल बडगे, अवधूत चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे यांचा लवकरच दौरा
राज ठाकरे येत्या काही दिवसांत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील काही जागांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र, विदर्भात पक्षाचा जनाधार अन्य कोणत्याही पक्षाला हानी पोहोचेल इतका नाही, असे बोलले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा जागांपैकी एका कार्यकर्त्याने केवळ एका दक्षिण-पश्चिम जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
चर्चेचा अहवाल निरीक्षक पक्षप्रमुखांना सादर करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथून प्रतिनिधित्व करत आहे. नागपुरातील चर्चेचा अहवाल निरीक्षक पक्षप्रमुखांना सादर करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी विदर्भात चांगले संघटन उभे केले होते. परंतु, नंतर विविध कारणाने अनेक पदाधिकारी इतर पक्षांत गेले. 2014 च्या निवडणुकीत प्रशांत पवार यांनी पश्चिम नागपूरमधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
राज ठाकरेंनी त्यांच्यासाठी सभाही घेतली होती. पण पवारांना केवळ 2300 मते मिळवता आली. याच निवडणुकीत जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातून किशोर सरायकर यांनी नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना केवळ 1027 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
हेदेखील वाचा : रवींद्र वायकर यांच्यानंतर शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याच्या खासदारकीला आव्हान; समन्सही बजावलं