मुंबई : जगप्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांनी धक्कादायक वक्तव्य केले. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये (Vibrant Gujarat Global Summit) मुकेश अंबानी यांनी रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असे विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर अंबानींच्या या विधानावर उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान मनसेने अंबानीच्या या वक्तव्यावर जहरी टीका केली असून मग महाराष्ट्रात कशाला आलात असा सवाल मनसेचे (MNS) प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे.
संदीप देशपांडे यांनी मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी रिलायन्स कंपनी गुजराथी असल्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. “आम्हाला रिलायन्स कंपनी भारतीय वाटली होती. पण त्यांनी काल स्पष्ट केलं की, रिलायन्स गुजराती कंपनी आहे. इथे तुमची कंपनी उभारण्यासाठी मराठी माणसाने जमिनी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला ही कंपनी गुजरातची वाटत असेल तर सगळा बोऱ्याबिस्तारा गुंडाळा,अँटेलियालाही गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात तुमचं काय काम आहे? मराठी माणसाने यापुढे विचार केला पाहिजे. मराठी लोकांनी रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना विचार केला पाहिजे की, आपण हे भारतीय कंपनीकडून नाही घेत आहोत, आपण गुजराती कंपनीकडून घेत आहोत. ह्यांचा उद्देश फक्त गुजरातचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे.” अशा कडक शब्दांत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा त्यांच्या बाजूला उपस्थित होते. त्यावेळी निदान मोदींनी तरी त्यांना सांगायला हवं होतं, तुझी कंपनी भारतीय आहे, गुजराती नाही. आता पंतप्रधानही गुजरातचे आहेत की देशाचे हासुद्धा विचार करण्याचा विषय आहे. जेव्हा राज ठाकरे आणि आम्ही मराठी भाषेबद्दल बोलतो तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित ठरवतो. हे महाराष्ट्राबद्दल विचार करतात हे संकुचित आहेत, हे फक्त मराठी माणसाबद्दल विचार करतात. मग मुकेश अंबानी संकुचित नाही का? मोदी फक्त गुजरातबद्दल विचार करत असतील तर ते संकुचित नाहीत का? हा प्रश्न आहे.” असे संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
मराठी माणसांना आवाहन करत संदीप देशपांडे म्हणाले, “यात मराठी माणसाने जागरूक होण्याची गरज आहे. मराठी माणसाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय, याबद्दल मराठी माणसानं जागरूक राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या जमिनी जातायत आणि तिथे गुजरात्यांचे उद्योग होतायत, मराठी माणसाला रोजगारही मिळत नसल्याचंही” संदीप देशपांडे यांनी सांगितले.