
मुंबई : कोविड काळात खरी रुग्णसेवा करणाऱ्या राज्यातील १५०० हून अधिक निवासी डॉक्टरांना सरकारनेच जाहीर केलेल्या ऋणनिर्देश यादीत स्थान नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. चार महिन्यापूर्वी वैद्यकीय शिक्षणात प्रवेश घेतलेल्या डॉक्टर या ऋणनिर्देश यादीत समाविष्ट आहेत. मात्र २०१८ बॅचमधून पास झालेल्या आणि कोविड सेवा करणाऱ्या डॉक्टरांना ऋणनिर्देश रकमेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील १५०० हून अधिक निवासी डॉक्टर नाराज झाले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टरांना ऋणनिर्देश म्हणून सव्वा लाखांचे अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मागील दोन वर्षापासून करत असलेल्या कोरोना रुग्णसेवेतील योगदानाचे हे बक्षीस असल्याचे सांगण्यात आले. यासाठी २६ कोटी ७ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र यात २०१८ ते २०२१ दरम्यान पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या निवासी डॉक्टरांचा उल्लेखही नाही. त्यामुळे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड सिनियर रेसिडंट डॉक्टर (एमएबीेआरडी) या संघटनेकडून मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आले आहे तसेच याबाबत पालिका आयुक्त व महापाैर यांनी याबाबत लक्ष द्यावे व आम्हाला न्याय द्यावा असे पत्र पाठविण्यात आले असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
मुुंबईतील केईएम, सायन आणि नायर वैद्यकीय महाविद्यालयात २०१८ ते २०२१ दरम्यान पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या निवासी डॉक्टरांनी २०२० पासून कोविड काळात रुग्णसेवेत योगदान दिले. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जीवाची बाजी लावून कोविड रुग्ण सेवा केल्याने या ऋणाचे खरे मानकरी २०१८ बॅचचे निवासी डॉक्टर आहेत.
मात्र त्यांचा या ऋणनिर्देश यादीत समावेश नसल्याचे पत्रातून कळविण्यात आले आहे. पदव्युत्तर अभ्याससक्रमाच्या प्रवेश प्रक्रियाच पूर्ण झाली नसताना ६८५ निवासी डॉक्टरांचे कोरोना सेवेत योगदान नसतानाही त्यांचा समावेश करण्यात आला. मात्र ज्यांनी खरी रुग्णसेवा केली. त्यांना वगळण्यात आले असल्याची खंत या निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
याबाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड सिनियर रेसिडंट डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंडे यांनी सांगितले की, २०१८ च्या बॅचमधील राज्यातील १५०० हून अधिक निवासी डॉक्टरांचा ऋणनिर्देश यादीत समावेश नाही. यापूर्वी सदर बाबीचा पाठपुरावा सचिव पातळीवर करण्यात आला. मात्र उपयोग झाला नाही. यात ६८० डॉक्टर एकट्या मुंबईतील आहेत. कोविड ओसरत आल्यावर आमचा विसर पडला असल्याची खंत डॉ. मुंडे यांनी व्यक्त केली.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या आदेशानुसार निवासी डॉक्टरांना ऋणनिर्देश देण्यात येत आहे. मात्र या मुद्यावर पुन्हा पडताळणी करुन पहावी लागेल.
काेविडमध्ये कार्यरत असलेल्या निवासी डाॅक्टरांचा यामध्ये बॅचप्रमाणेच समावेश करण्यात आला आहे. काेविड काळात निवासी डाॅक्टरांनी केलेल्या कामाचा ऋणनिर्देश यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. या यादीप्रमाणेच सन्मान केला जाणार आहे. यात काेणालाही वंचित ठेवण्यात आले नाहीये.
– डाॅ. रमेश भारमल, संचालक – मुंबई पालिका प्रमुख रुग्णालय