Ajit Pawar
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे फर्डे आणि स्पष्टवक्ते म्हणून महाराष्ट्राला परिचीत आहेत. त्यामुळेच, आपल्या भूमिकेवर बोलताना ते परखडपणे मत मांडतात. नुकतेच बारामती येथे ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी बारामतीने आता माझं ऐकावं असे म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. बरीच वर्षे त्यांचे ऐकले आता माझे ऐका, असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी बारातमतीत राजकीय टोलेबाजी करताना शासकीय धोरणांवरही भाष्य केलं. त्यात, राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी वयाच्या ६० व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला
इथून पुढे माझं ऐका. कुणाचेही ऐकू नका. मी वयाच्या ६० व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर ३८ व्या वर्षीच घेतला होता अशा शब्दांत अजितदादांनी नाव न घेता होम मैदानातून थेट काकांना लक्ष्य केलं. यावेळी, आपण सत्ताधारी भाजपासोबत का गेलो हे सांगताना अजित पवारांनी राज्य सरकारच्या कामांचाही उल्लेख केला. तसेच, लवकरच राज्यात चौथे महिला धोरणा आणले जाणार असून महिलांचा मोठा सन्मान केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण
‘महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”, अशी माहितीही अजित पवार यांनी बारामतीतून दिली.
राज्य सरकारनेही घेतला महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, अनेकजण आपल्या नावानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही अशी अनेक नावे आहेत. तर, मंत्रीपदाची किंवा आमदारकीची शपथ घेताना, काही नवीन युवा आमदारांनीही आधी आईचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, महिलांचा, आईचा अशाप्रकारे सन्मान केला जात असल्याची बाब उल्लेखनीय आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी ही धोरणात्मक बाब जाहीर केली.
कार्यकर्त्याला मिश्कील टोला
बारामतीमधील सरपंच आणि उपसरपंचाशी संवाद साधत असताना मतदारसंघातील लोकांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करत अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. बारामतीच्या खराडवाडी येथे महाविद्यालय काढा अशी मागणी एका कार्यकर्त्याने केली होती. त्यावर गमतीशीर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, खराडवाडी केवढी, तिथं महाविद्यालय उघडून विद्यार्थी कुठून आणणार. कार्यकर्ता म्हणाला, तुम्हीच आणायचे विद्यार्थी. यावर अजित पवार म्हणाले, आता माझं वय झालं नाहीतर आणलीच असती. मी इतके शांत डोके ठेवून काम करत असतो, तरी काही लोक चिडायला लावतातच, अशी मिश्कील कोपरखळीही अजित पवारांनी लगावली.