Mumbai Rain Update : काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शनीवारपासून जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर या पावसाचा फटका रेल्वेवाहतूकीला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे.
बदलापूरकरांना रेल्वेच्या साडेसातीने अक्षरशः हैराण केले आहे. आधीच अपुऱ्या रेल्वे फेऱ्या, रेल्वे स्थानकावर सुरु असलेले बांधकाम, याचा त्रास असताना, आता लोकल गळतीने ऐन गर्दीच्या प्रवासात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे आम्ही नक्की किती त्रास सहन करायचा असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
बदलापूर स्थानकातून सीएसएमटी कडे सकाळी 10.58 लोकलच्या छपराला गळती लागली असल्याने, पावसाचे सगळे पाणी थेट डब्यात साचत होते. यामुळे ऐन गर्दीत लोकल मध्ये असूनही चिंब भिजून, आणि आसनांवर देखील पाणी पडल्याने, प्रवाशांचे मोठे हाल झाले. गर्दीच्या वेळेत पाण्यापासून बचावासाठी इंच भर सुद्धा हलता येत नसल्याने, अनेक प्रवासी त्याच पावसाच्या थेंबात भिजत उभे राहून प्रवास करत होते. त्यामुळे निदान आम्हाला चांगल्या दर्जाच्या लोकल तरी उपलब्ध करुन द्या अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
रात्रीपासून रायगड जिल्ह्यात व बदलापूर शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या जल प्रवाहात वाढ झाली असून, चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. मात्र याच पाण्यात मासेमारी करण्यासाठी हौशी नागरिकांची नदीवर रेलचेल पाहायला मिळत आहे.
काल रात्रीपासून शहरात चांगलाच पाऊस कोसळत आहे. दुपार पर्यंत अंबरनाथ तालुक्यात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे समोर येत आहे. पावसाची नोंद कमी असली तरी, कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि उल्हास नदीचा प्रवाह हा कर्जत तालुक्यातून शहरात येत असल्याने, बदलापूर मधून वाहणाऱ्या नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असून, नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. मान्सून आता सक्रिय झाला असल्याने, चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरु राहिला तर, उल्हास नदी धोक्याची पातळी गाठेल अशी शंका व्यक्त करण्यात येत असून, नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मात्र उल्हास नदीला पाणी वाढल्याने, मासेमारीचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी नागरिकांची वर्दळ नदीवर पाहायला मिळत असून, जास्त खोलवरील पात्राच्या काठावर न राहता काळजी घेऊन, मासेमारीचा आनंद हे नागरिक घेत आहेत.