मुंबई : चित्रपट सृष्टीतील प्रख्यात कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा मेहुणा जेसन वॉटकिन्सचा मृतदेह आज त्यांच्या मुंबईतील मिल्लत नगर येथील निवासस्थानी सापडला. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ओशिवरा पोलिसांनी त्याचा मृतदेह विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला, सध्या त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
जेसन वॅटकिन्स त्यांच्या मुंबईतील घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की जेसनला कूपर रुग्णालयात आणले आणि ओशिवरा पोलीस आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत. मात्र, रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांनी मृत्यूला दुजोरा दिला आहे.
जेसन सॅवियो वॅटकिन्स हा अंधेरी पश्चिम येथील यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये राहत होता. सकाळी त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. जेसनने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. दुपारी १२ वाजता मुख्य नियंत्रण कक्षाला अंधेरी यमुना नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसनला खाली उतरवले आणि कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी जेसनचे ७४ वर्षीय वडील डेसमंड सिरिल डन्स्टन आणि बहीण लिझी रेमो डिसूझा यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
रेमो डिसूजाची पत्नी लिझेल रेमो डिसूझा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, तिचा भाऊ आता या जगात नाही. तिचा भाऊ जेसनचे फोटो शेअर करत तिने लिहिले- “का? तू माझ्यासोबत असे का केलेस? मी तुला कधीच माफ करणार नाही.”