Manoj Jarange News:
मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. पण काल मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावत आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी देण्यात आलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी दिलेल्या परवानग्या नाकारल्या आहेत.
पण लाखो मराठा आंदोलकांमुळे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून आझाद मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नये, मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल खोलवर काळजात रुतणारी असेल, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानातून हुसकावून लावू नका. तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर, ते घातक होईल. आमच्या मराठा आंदोलकांवर लाठी मार केला तर ते तुमच्यासाठी अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांच्या अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकार आणि फडणवीस यांना दिला आहे.
तसेच, तुम्ही आम्हाला कितीही भिती घातली तरी आम्ही घाबरणार नाही, आम्ही मराठ्यांची औलाद आहोत. आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहुद्या, फडणवीस मी जे बोलतो, ते होत असंत. आणखी मराठे मुंबईत यायला सुरूवात झाली नाही. शनिवारी आणि रविवारी मराठे मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान होईल. ती वेळ येऊन देऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त काय करणार? 100 पोलीस आले तरी अटक करणार आणि 1 लाख पोलीस आले तरी अटक करुन जेलात टाकणार. आम्ही तिथही उपोषण करू. पण आता सरकाला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
सरकार गोरगरिबांना विसरलं, तर न्यायालय त्यांना आधार देते. आम्हाला न्यायदेवता शंभर टक्के न्याय देईल. आम्ही लोकशाहीच्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेले नाही. आम्ही शांततेत उपोषण करत आहोत. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आम्ही काल रात्री सगळ्या गाड्या काढल्या. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. यापेक्षा कायद्याचं पालन काय करायचं? असा सवाल मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारने नको त्या विषयात घुसू नये. आम्हाला आझाद मैदानातून हाकलून देण्याच्या वल्गना बंद करा. मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. सरकार कुठल्याही थराला गेले, तरी मी त्या थराला जाईन. मराठा काय असतात, हे ३५० वर्षांनी पुन्हा दाखवायचे असेल, तर माझा नाईलाज आहे, अशा तीव्र शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली.