Mumbai Metro Aqua Line Passport and Stamps
मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRC) मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाइन) वरील दहा स्थानकांवर आजपासून अॅक्वा लाइन पासपोर्टची विक्री सुरू केली आहे. हा अॅक्वा लाइन पासपोर्ट कफ परेड, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, वरळी, सिद्धिविनायक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), सीएसएमआयए-टी२ आणि मरोळ नाका या मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. (Mumbai Metro Aqua Line Passport on sale at 10 stations)
‘अॅक्वा लाइन पासपोर्ट अँड स्टॅम्प ट्रेल’ या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला हा मर्यादित आवृत्तीचा अॅक्वा लाइन पासपोर्ट प्रवासी, मेट्रोप्रेमी, पर्यटक आणि मुंबईला भेट देणाऱ्यांना मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेचा अनुभव घेताना विशेष स्थानक स्टॅम्प संकलित करण्याची अनोखी संधी देतो. या अॅक्वा लाइनवर आधारित पासपोर्टची किंमत २५० रुपये आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असलेल्या या पासपोर्टमध्ये पोस्टकार्डच्या धर्तीवरील कलाकृती समाविष्ट आहेत तसेच स्टॅम्पसाठी स्वतंत्र पाने देण्यात आली आहेत. मेट्रो-३ च्या संपूर्ण मार्गाच्या संचालनाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या पासपोर्ट ची निर्मिती करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे अॅक्वा लाइन ही भारतातील स्वतःचा स्वतंत्र पासपोर्ट आणि १० स्थानकांवर आधारित स्टॅम्प ट्रेल सुरू करणारी पहिली मेट्रो ठरली आहे. या उपक्रमाद्वारे मेट्रो प्रवास अधिक रंजक आणि संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रवाशांना मेट्रो -३ वरील दहा स्थानकांवरून स्टॅम्प संकलित करून आपला अॅक्वा लाइन स्टॅम्प ट्रेल पूर्ण करता येईल. हा पासपोर्ट ₹२५० मध्ये केवळ डिजिटल पेमेंटद्वारे उपलब्ध आहे. पासपोर्टची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांनी आपली प्रत लवकरात लवकर घेऊन अॅक्वा लाइनच्या या विशेष प्रवासाची सुरुवात करावी.






