पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहरात येणार्या आठ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार मोहोळ यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, तर पुढील आठवड्यापासून मुंडे या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
भाजपने प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म पद्धतीने नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी प्रदेश कार्यालयाने प्रवासी बैठका हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यात प्रत्येक नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्या कसबा पेठ, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघांची जबाबदारी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर आणि खडकवासला या पाच मतदारसंघांची जबाबदारी आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
पदाधिकाऱ्यांची भूमिका घेतली जाणून
या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदार नाव नोंदणी मोहीम, बूथ रचना, शासकीय कार्यक्रमांचा आढावा, महिलांचे कार्यक्रम, योजनांचा लाभार्थ्यांना कसा फायदा होईल आणि निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व कामांचा आढावा घ्यायचा आहे. मोहोळ यांनी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका, पार्टीचे धोरण, पदाधिकार्यांची भूमिका जाणून घेतली.
जागावाटप कधी होणार?
राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. दिवाळीनंतरच निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे जागावाटप खूप रखडलेले पाहायला मिळालं. त्यामुळे उमेदवारांची घोषणा, कोणाला कोणती जागा यात वेळ गेला. त्याचा फटका महायुतीला बसला. मात्र आता जागावाटप लवकर मार्गी लावायचे असे महायुतीने ठरवल्याचे दिसते आहे. येत्या १० दिवसांत महायुतीचे जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.