Nagpur News : रायझिंग नागपूरसाठी विकासाचा महाआराखडा; ४०० गुंतवणूकदार येणार; चेहरामोहरा बदलणार

नागपूरच्या पायाभूत विकासासाठी महापालिका खासगी गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारत आहे. ३० नोव्हेंबरला होणाऱ्या रायझिंग नागपूर समिटमध्ये ४०० गुंतवणूकदारांसमोर प्रमुख प्रकल्प मांडले जाणार असून, १३ बाजारपेठांचा कायापालट, जुने कारागृह स्थलांतर आणि बसस्थानक पुनर्विकासावर भर दिला जाणार आहे.
फोटो सौजन्य AI
Nagpur News फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • खासगी गुंतवणुकीतून नागपूरचा विकास; दिग्गज नेते उपस्थित राहणार

  • जमिनींच्या व्यावसायिक वापरातून निधी; बीओटी आणि पीपीपी मॉडेलवर भर

  • १३ बाजारपेठांचा कायापालट; जुने कारागृह स्थलांतरित करण्याचाही प्रस्ताव

Nagpur News : नागपूर शहराच्या विकासाला आर्थिक गती देण्यासाठी महापालिकेने खासगी गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला आहे. शहरातील रखडलेले आणि प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी हॉटेल रेडिसन येथे ‘रायझिंग नागपूर – इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट मीट २०२६’चे आयोजन करण्यात येणार आहे.

या परिषदेत राज्यातील जवळपास ४०० गुंतवणूकदार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठांचा पुनर्विकास, आधुनिक बसस्थानक, निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसह नागपूरच्या भविष्यातील विकासाचा आराखडा यावेळी मांडला जाणार आहे.

खासगी गुंतवणुकीतून नागपूरचा विकास; दिग्गज नेते उपस्थित राहणार

महापौर नीता ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या गुंतवणूक परिषदेची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले आणि राज्यमंत्री आशीष जायसवाल यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू आहे. एम्स, आयआयएम आणि लॉ युनिव्हर्सिटीसारख्या राष्ट्रीय संस्थांमुळे नागपूरचे महत्त्व वाढले आहे. पुढील दशकातील विकास लक्षात घेऊन 'विकसित नागपूर'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

फोटो सौजन्य AI
Nagpur News : महिला पतसंस्थेत २.७३ कोटींचा घोटाळा; ५९ ठेवीदारांची फसवणूक; दाम्पत्यासह १४ जणांवर गुन्हा

जमिनींच्या व्यावसायिक वापरातून निधी; बीओटी आणि पीपीपी मॉडेलवर भर

महापालिकेच्या स्वतःच्या आर्थिक स्रोतांवर अवलंबून राहून मोठे प्रकल्प उभारणे शक्य नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या लँड मॉनेटायझेशन धोरणाचा आधार घेतला जाणार आहे. मनपा, एमएसआयडीसी आणि एनआयटी/एनएमआरडीए या संस्था एकत्रितपणे निधी उभारणीसाठी काम करणार आहेत.

बीओटी आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) पद्धतीने प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. समिटमध्ये प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता आणि गुंतवणुकीची प्रारूपे गुंतवणूकदारांसमोर मांडली जाणार आहेत.

फोटो सौजन्य AI
Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली

१३ बाजारपेठांचा कायापालट; जुने कारागृह स्थलांतरित करण्याचाही प्रस्ताव

नागपूरमधील १२ ते १३ प्रमुख बाजारपेठांचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. यामध्ये कॉटन मार्केट, नेताजी मार्केट, संताजी मार्केट, कमाल चौक, सक्करदरा मार्केट, लोहा ओली, गणेशपेठ, गणेशपेठ फूल मार्केट, आशीर्वादनगर आणि अंबाझरी मार्केटचा समावेश आहे.

याशिवाय शहरातील जुने मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर हलविण्याचा प्रस्ताव असून, त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या सुमारे १२० एकर जागेवर निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. गणेशपेठ बसस्थानकाचा आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच अजनी, काचीपुरा आणि सेंट्रल पार्कसारख्या प्रकल्पांसाठीही खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.