Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली

महाराष्ट्रात २०१० पासून सुरू असलेल्या पॅरामेडिकल अभ्यासक्रमांना १६ वर्षे उलटूनही विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रश्न कायम आहे. भरतीचे नियम, केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया आणि नागपूरमधील प्रस्तावित प्रादेशिक संस्थेचा प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित झाले आहे.
Medical Students
Medical Students फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • प्रवेश प्रक्रियेत एकसमानतेचा अभाव; विद्यार्थ्यांची फरफट

  • अभ्यासक्रम सुरू, पण भरतीचे नियम नाहीत; रोजगाराचा पेच

  • प्रशिक्षणादरम्यान कामाचा बोजा; नागपूरची प्रादेशिक संस्था रखडली

Nagpur News : राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये कुशल तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने २०१० पासून विविध पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. मात्र, तब्बल १६ वर्षे उलटूनही या अभ्यासक्रमांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही.

दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करत असले, तरी सरकारी नोकरीच्या संधी आणि भरतीचे नियम अद्याप स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यात ४० हून अधिक सरकारी वैद्यकीय महाविद्यालये असताना केवळ १८ महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू आहेत.

प्रवेश प्रक्रियेत एकसमानतेचा अभाव; विद्यार्थ्यांची फरफट

राज्यातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी अद्याप केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. प्रत्येक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया राबवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या नियमांनुसार प्रवेशासाठी प्रयत्न करावे लागतात.

दरवर्षी सुमारे १,१०० जागा उपलब्ध असतानाही प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधींचा अभाव असल्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यस्तरावर एकसमान प्रवेश व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे.

Medical Students
Nagpur News : महिला पतसंस्थेत २.७३ कोटींचा घोटाळा; ५९ ठेवीदारांची फसवणूक; दाम्पत्यासह १४ जणांवर गुन्हा

अभ्यासक्रम सुरू, पण भरतीचे नियम नाहीत; रोजगाराचा पेच

पॅरामेडिकल शिक्षणाला सुरुवात होऊन १६ वर्षे झाली, तरी अनेक तांत्रिक संवर्गांतील पदांसाठी सेवा भरतीचे नियम तयार झालेले नाहीत. कम्युनिटी मेडिसिन टेक्निशियन, फॉरेन्सिक सायन्स टेक्निशियन आणि एंडोस्कोपी टेक्निशियन यांसारख्या पदांवरील नियमित भरतीचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही.

असोसिएशन ऑफ अलाइड हेल्थकेअर प्रोफेशनल्सचे राज्य सचिव अक्षय भांडवलकर आणि कार्यकारी अध्यक्ष युगांत फासे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी मिळत नसल्याने त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Medical Students
Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम

प्रशिक्षणादरम्यान कामाचा बोजा; नागपूरची प्रादेशिक संस्था रखडली

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करून घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत. पात्र पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी आवश्यक तांत्रिक पात्रता नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

दुसरीकडे, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रस्तावित प्रादेशिक पॅरामेडिकल संस्थेचा प्रश्नही अनेक वर्षांपासून रखडला आहे. या संस्थेमुळे शिक्षण, प्रशिक्षण आणि तांत्रिक मनुष्यबळ विकासाला एकसमान दिशा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रस्ताव प्रत्यक्षात न आल्याने हा मुद्दा आता विधिमंडळात उपस्थित करण्याची गरज निर्माण झाली आहे.