Nagpur News : महिला पतसंस्थेत २.७३ कोटींचा घोटाळा; ५९ ठेवीदारांची फसवणूक; दाम्पत्यासह १४ जणांवर गुन्हा

नागपुरातील पदवीधर महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ५९ ठेवीदारांकडून २.७३ कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. मुदत संपल्यानंतर पैसे परत न करता कार्यालय बंद करण्यात आले. या प्रकरणी १४ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.
फोटो सौजन्य AI
फोटो सौजन्य AI फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • आकर्षक व्याजदराचे आमिष; ५९ ठेवीदारांनी जमा केले कोट्यवधी रुपये

  • कार्यालयाला टाळे; १४ पदाधिकारी आणि संचालकांविरुद्ध गुन्हा

  • ठेवींच्या पैशांतून मालमत्ता उभारल्याचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

Nagpur News : नागपुरात आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुदत ठेव (FD) आणि दैनंदिन वसुली योजनांच्या माध्यमातून ५९ ठेवीदारांकडून तब्बल २ कोटी ७३ लाख ८८ हजार ७८५ रुपये जमा करण्यात आले. मात्र, ठेवींची मुदत संपल्यानंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेच्या कार्यालयाला टाळे ठोकून पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी १४ पदाधिकारी आणि संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आकर्षक व्याजदराचे आमिष; ५९ ठेवीदारांनी जमा केले कोट्यवधी रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी पदवीधर महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. संस्थेचे मुख्य कार्यालय नवी शुक्रवारी, महाल परिसरात होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पोटे आणि अध्यक्ष ममता पोटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आकर्षक व्याजदराचे आश्वासन देत नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून सूर्यकांत शुक्ला यांच्यासह ५९ ठेवीदारांनी एफडी आणि आरडी योजनांमध्ये एकूण २ कोटी ७३ लाख ८८ हजार ७८५ रुपये जमा केले. मात्र, मुदत संपल्यानंतर पैसे मागणाऱ्या ठेवीदारांना परतावा देण्यास संस्थेने असमर्थता दर्शवली.

कार्यालयाला टाळे; १४ पदाधिकारी आणि संचालकांविरुद्ध गुन्हा

ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी संस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, संस्थेकडे पैसे नसल्याचे कारण देत पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कार्यालयाला टाळे लावण्यात आले आणि पदाधिकारी गायब झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी सूर्यकांत शुक्ला यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पोटे, अध्यक्ष ममता पोटे, उपाध्यक्ष गीता सातपुते यांच्यासह एकूण १४ पदाधिकारी आणि संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

ठेवींच्या पैशांतून मालमत्ता उभारल्याचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशातून स्वतःची मालमत्ता उभारल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तपासादरम्यान संस्थेशी संबंधित आणखी दोन शाखा किंवा संस्था असल्याची माहिती समोर आली असून तिन्ही कार्यालये सध्या बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे ठेवीदारांचे पैसे नेमके कुठे वळवण्यात आले, आर्थिक व्यवहार कोणत्या माध्यमातून झाले आणि या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जाणार आहे. आयुष्यभराची कमाई पतसंस्थेत गुंतवणाऱ्या ठेवीदारांना आता आपले पैसे परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.