धनंजय मुडेंच नाही तर पंकजा मुंडेंच्याही अडचणीत वाढ? या जिल्ह्यातूनही होतोय पालकमंत्रिपदासाठी विरोध
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राकारण ढवळून निघालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला खंडणी आणि संतोष देशमुख हत्येशी या खंडणीचा संबंध असल्याच्या संशयावर अटक झाली आहे. शिवाय त्याच्या मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या लवकरच होणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद आणि मंत्री मुंडे बंधू-भगिनीला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Konkan Politics : ठाकरे गटाचा बडा मासा शिंदेंच्या गळाला; उदय सामंतांनी प्रवेशाची तारीखही सांगितली
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी बीडचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं अशी मागणी केली जात आहे. आमदार सुरेश धस यांनी वारंवार याचा उल्लेख केला आहे. अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला हे आव्हान मानलं जात आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या तिघांपैकी एक पालकमंत्री आम्हाला चालतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नांदेड जिल्ह्याच्याही पालकमंत्रिपदी मंत्री मुंडे बंधू-भगिनी नको, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. नांदेडचा बीड करायचा नाही, असा टोला मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी लगावला आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु वाल्मिक कराडच्या ‘SIT’ कोठडीमुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला.
नांदेड मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असून बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिथल्या गुन्हेगारीचे अनेक किस्से समोर येत आहेत. त्यामुळे आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचा नाही. बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजू नये, म्हणून राज्य सरकारने बीडचे मंत्री मुंडे बंधू-भगिनींना नांदेडचे पालकमंत्रिपद देऊ, नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
नांदेडचे भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत भाजपच्या महाविजय अधिवेशनात पंकजा मुंडे यांच्या नांदेडच्या पालकमंत्रिपदावर मत व्यक्त केले होते. मात्र अशोक चव्हाण यांनी, तो फार मोठा विषय नाही, असं म्हणत एका वाक्यात विषय संपवला होता. दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्रीपदाच्या लवकरच घोषणा होणार असल्याचं जाहीर केले आहे. यात मंत्री मुंडे बंधू-भगिनीला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार याचीच राज्यभर चर्चा आहे.