सांगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीसाठी सांगली तर महायुतीसाठी नाशिक हे मतदारसंघ अडचणीचे ठरले. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगलीला ओळखले जात होते. मात्र ही जागा शिवसेनेला दिल्यामुळे सांगलीमधील कॉंग्रेस पदाधिकारी नाराज होते. सांगलीमध्ये शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी जयंत पाटील यांचे नाव सांगलीचा गुंता वाढवण्यामध्ये सातत्याने समोर आले. निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील यांनी आपल्या आरोपांवरचे स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवारांच्या प्रभावामुळे गेम पलटला
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकसभेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या प्रभावामुळे गेम पलटला आणि लोकसभेत राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं. त्यातल्या त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं फारच कमी जागा लढल्या, पण जास्त जागांवर यश मिळवलं. शदर पवारांनी 10 जागा लढवल्या आणि त्यापैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण राज्यभर शरद पवारांचाच बोलबाला पाहायला मिळाला, असे जयंत पाटील म्हणाले.
आम्ही युतीधर्म पाळला
त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नसल्याचे दिसून आले. एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाली. निकालानंतर अपक्ष लढलेल्या विशाल पाटील यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. यावेळी जयंत पाटील यांचे नाव नकारात्मक प्रतिमा म्हणून येऊ लागले. यावर आज जयंत पाटील यांनी मौन सोडले. ते म्हणाले, सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज पसरत गेले. पण, सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. वेगळी कृती केली असती, तर काँग्रेस-शिवसेना दुखावली गेली असती, असे मत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.