कांदा व दुध हमीभावासाठी निलेश लंकेचे आंदोलन; मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये!
शेतकऱ्यांना कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा. या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर लोकसभेचे खासदार निलेश लंके यांनी आंदोलन उभारले आहे. मागील दोन दिवसांपासून अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयसमोर त्यांनी हे आंदोलन उभारले असून, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये गेल्या दोन दिवसांपासून खासदार निलेश लंके यांच्यासह त्यांच्या पत्नी राणी लंके यादेखील सहभागी झालेल्या आहेत. काल त्यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी स्वतः चुलीवर पिठले भाकरी बनवली. आज पारनेर तालुका व आसपासच्या गावातील असंख्य महिला या ट्रॅक्टरसह सहभागी ज्याचे नेतृत्व राणी लंके यांनी ट्रॅक्टर चालवून केले आहे.
‘हे’ बडे नेते लावणार आंदोलनस्थळी उपस्थिती?
विशेष म्हणजे आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे उद्या खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भेट देणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच आंदोलकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावात, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे.
नेमकी काय आहे लंके यांची मागणी?
राज्यात कांदा हे महत्वाचे पीक असून, कांदा दराबाबत शेतकऱ्यांना नेहमीच अनिश्चितता असते. त्यामुळे मोठा उत्पादन खर्च करूनही शेतकऱ्यांना ऐन काढणीला आलेला कांदा अल्प दरात विक्री करावा लागतो. परिणामी, त्यांना योग्य ते आर्थिक उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला कांद्याचा हमीभाव माहिती असेल. तर शेतकऱ्यांना कांद्याच्या उत्पादनातून आर्थिक उत्पन्न मिळण्याची हमी असेल. ज्यामुळे खासदार निलेश लंके यांनी कांदा पिकाला हमीभाव देण्याची प्रमुख मागणी केली आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना दूध दराबाबत देखील मोठी अनिश्चितता असते. ज्यामुळे दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक करुनही शेतकऱ्यांना कमी दूध दराऐवजी मोठा आर्थिक फटका बसतो. याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी शेतकऱ्यांची दुखरी नस पकडून हे आंदोलन उभारले आहे.