दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
पूर्व उपनगरांमध्ये कचरा वाहून नेणारी वाहने रस्त्यात अचानक बंद पडल्यामुळे दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा आणि नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रस्त्यावर नादुरुस्त होणाऱ्या कचरा गाड्यांची जागेवरच तातडीने दुरुस्ती करता यावी, यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून तीन नवीन अत्याधुनिक ‘विघाडदुरुस्ती वाहने’ खरेदी करण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी पालिकेकडून सुमारे १ कोटी ४८ लाख ४० हजार ५३० रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
पद्मसिंह पाटील यांच्या अडचणींत होणार वाढ; पवनराजे निंबाळकर खून खटल्यातील निर्दोष सुटकेला आव्हान
मुंबई शहरात दररोज हजारो टन कचरा जमा करून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेचा मोठा वाहन ताफा अविरत कार्यरत असतो. कचरा वाहतुकीदरम्यान अनेकदा वाहनांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन ती रस्त्यातच बंद पडतात. अशा वेळी ती दुरुस्त करून पुन्हा सेवेत आणण्यासाठी विघाडदुरुस्ती वाहनांची मदत घेतली जाते. पूर्व उपनगरांमध्ये सध्या अशी पाच विघाडदुरुस्ती वाहने कार्यरत आहेत. मात्र, त्यातील काही वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमांनुसार विहित वयोमर्यादा संपली असून ती स्क्रैप करावी लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत कोणताही खंड पडू नये यासाठी पालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक अशा ‘बीएस-६’ मानांकनाची तीन नवीन वाहने ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
कराराच्या अटीनुसार संबंधित कंपनीला पुढील सहा महिन्यांत या वाहनांची बॉडी निर्मिती करून ती पालिकेकडे सुपूर्द करावी लागणार आहेत.
ही अद्ययावत वाहने सेवेत दाखल झाल्यानंतर कचरा गाड्यांची रस्त्यावरच जलद दुरुस्ती शक्य होणार असून, पूर्व उपनगरांतील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
या कामासाठी महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत तीन पुरवठादारांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी सर्वात कमी दराची निविदा सादर करणाऱ्या ‘मॅक एन्च्युरेटेक अँड सोल्युशन्स (इंडिया) प्रा. लि.’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत तीन वाहनांच्या चेसिससाठी ७१ लाख ९३ हजार २८० रुपये, तर त्यांच्या बॉडी निर्मिती व पुरवठ्यासाठी ७० लाख ७६ हजार ४६० रुपये खर्च होणार आहेत. या दोन्ही रकमांची बेरीज १ कोटी ४२ लाख ६९ हजार ७४० रुपये होते. त्यावर चार टक्के सानुग्रह रक्कम म्हणून ५ लाख ७० हजार ७८९ रुपये ६० पैसे मिळून एकूण खर्च १ कोटी ४८ लाख ४० हजार ५३० रुपयांवर पोहोचला आहे.






