इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्व शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे, दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे. या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू दिले जाणार नाही, असा निर्धार शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपुरात केला.
येथील निर्मला सांस्कृतिक भवन मध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष वर्षा काळे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले.
शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हे अनुभवत आलो आहे. शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम सध्या सुरू आहे. ऊस उत्पादकांसाठी असणारा एसएमपीचा कायदा शरद पवार आणि त्यांच्या पाळीव शेतकरी संघटनांनी एकत्रित येते २००९ ला रद्द केला. आता पुन्हा एफआरपीच्या कायद्यातील शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेतले आहेत. शेतकऱ्यांना दर मागण्यासाठी कोणत्याही तरतुदी ठेवलेल्या नाहीत.
ते म्हणाले ,”देशातील भाजप सरकार आणि राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चारही राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून द्या. ऊस व इथेनॉल कारखान्याची अंतराची अट जाणीवपूर्वक ठेवण्यात आली आहे. नव्याने कोणालाही इथेनॉलची निर्मिती करता येणार नाही. कायद्यानेच राजकारण्यांनी ही तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना गरीब करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऊसाला भावही देत नाहीत आणि दुसरे कारखाने उभे करू दिले जात नाहीत. चारही राजकीय पक्षांना सळो की पळो करा असा सल्लाही त्यांनी दिला.
धनंजय काकडे म्हणाले, “कारखान्याच्या माध्यमातून राजकारणी दलाल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी शेतकऱ्यांचे कधीही भले केले नाही. त्यांनी शेती व्यवस्था मोडीत काढली आहे.”
माणिक शिंदे म्हणाले,”ज्या राजकारण्यांनी तुम्हाला तुटले त्यांनाच तुम्ही मतदान करता त्यांना मतपेटीतून बाजूला सारा.” वर्षा काळे म्हणाल्या,”महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे.”
ऊस नियंत्रण समितीचे सदस्य बाळासाहेब पठारे म्हणाले,”उसाला योग्य भाव मिळाला नाही तरी शेतकरी ऊस उत्पादना पासून बाजूला जाईल. मूठभर लोकांच्या हाती कारखादारी आहे, तोपर्यंत तरी शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही. उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे खाजगी कारखानदारी आहे. तेथे उसाला दर मिळतो. याउलट महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावरील कारखानदारी राजकारण्यांनी मोडीत काढली आहे.आणि खासगी कारखानदारी ताब्यात घेतली आहे.ते शेतकरी हित पाहतच नाहीत.”
शिवाजीनाना नांदखिले यांचे भाषण झाले. धनपाल माळी यांनी आभार मानले. शेतकरी संघटनेचे लक्ष्मण पाटील, केतन जाधव, प्रणव पाटील, माणिक पाटील, रवींद्र पिसाळ, माणिक व परशुराम माळी,नंदू पाटील शंकरराव मोहिते, प्रदीप पवार यांनी संयोजन केले.
सुमनताई अग्रवाल यांना लाखाची थैली ..!
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात आवाज उठवण्याचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष सुमनताई अग्रवाल यांना एक लाख रुपये देत क्रांतिवीर आप्पासाहेब ऊर्फ रामचंद्र भाऊराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ व कमल पाटील यांनी सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
सुमनताई अग्रवाल मुळच्या वरुड -वर्धा येथील आहेत.
शेतकरी निर्धार..!
लोकसभा, विधानसभेसह कोणतेही राजकीय व्यासपीठावरून साखर कारखानदार निवडणूक लढवीत असेल तर त्याला पराभूत करा. महामंडळाच्या नावाखाली टनाला दहा रुपये कपात करण्याच्या आदेशाची होळी करा.
वीज बिल भरताना आपल्या शेतात असणाऱ्या वीज वितरण कंपन्यांच्या तारा, खांब, डीपी असल्याची जाणीव करून द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात याबाबत कायदा असल्याची माहिती देत दबाबतंत्र वापरा. शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
रघुनाथदादा व्हिलचेअर..!
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात जखमी झाले आहेत. ते आजच्या मेळाव्यात व्हिलचेअरवरून आले होते. शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या भावनेचे अनेक वक्त्यांनी कौतुक केले. तीन तासांहून अधिक वेळ ते व्यासपीठावर व्हिलचेअरवरून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत होते.