फोटो सौजन्य- प्रतिनिधी
फोंडाघाट बोकल भाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आटल्यावर आत्तापर्यंत खून दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. सिंधुदुर्गातील इतर गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असावा या दृष्टीने तपास केला जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३ लाख २६ हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली
फोंडाघाट गावातील बोकल भाटले येथील ममता पाटकर यांचे बंद घर १९ डिसेंबरला चोरट्यांनी फोडून आतील ३ लाख २६ हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली होती. त्याच रात्री फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील नवी कोरी होंडाशाईन मोटारसायकलही चोरीला गेली होती. या प्रकरणी तेथील सीसीटीव्ही फुटेज वरून कणकवली पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपास सुरू केला होता.
गुन्हा अन्वेषणच्या पथकाने नगर मधील कर्जत येथून ताब्यात
घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील कुख्यात आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले (वय २७) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याच्या मागावर पोलीस पथक ठेवण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी आटल्या याचा ठावठिकाणा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील न्यायालय परिसरात असल्याने आढळून आले. त्यानंतर काल गुन्हा अन्वेषणच्या पथकाने त्याला कर्जत येथून ताब्यात घेतले. त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फोंडाघाट येथील घरफोडी, दुचाकी चोरी तसेच अन्य गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. आटल्या याचा ताबा मिळावा यासाठी इतर जिल्ह्यातील पोलिसांनीही मागणी केली आहे. इथला तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला अन्य जिल्ह्यातील पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.आटल्या याच्या गुन्ह्यामध्ये त्याचा भाऊ आणि इतर सहकारी देखील सहभागी आहेत अशीही माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
घटनाक्रम
फोंडाघाट येथील बोकल भाटलेवाडीत 19 डिसेंबरला एक बंद घर चोरट्यांनी फोडले होते. घरातील कपाटे फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले. घरफोडी करुन पळून जाताना शेजाऱ्यांचे लक्ष गेले होते. दुपारी साधारण दीड दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घरफोडीमध्ये सहभागी असलेले तीन चोर दुचाकीवरुन फरार झाले. हे घर पाटकर कुटुंबियांचे आहे. मुकुंद पाटकर यांचे मराठे कॉलेज रस्त्याजवळ हॉटेल आहे त्यामुळे त्यांचे घर बंद असते. हे चोरट्यांनी हेरुन ही घरफोडी केली. पोलिसांनी 7 दिवसात या प्रकरणातील आरोपीचा छडा लावला.