अहमदनगर : आगामी जिल्हा परिषद (ZP Election) व पंचायत समिती निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी मिनी मंत्रालयातील कारभाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचू लागली आहे. नुकतेच गट गणांची रचना अंतिम झाल्यानंतर आता गट गणांच्या आरक्षणाची सोडत घोषित झाली आहे. येत्या 13 जुलैला ही सोडत होणार असून, त्यात कोणता गट आणि गण आरक्षित होणार आणि कोणाच्या गटात महिलांना संधी असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात गेल्या पंचवार्षिकला असलेल्या 73 गटात यंदा बारा गट संख्येने वाढ होऊन गटांची संख्या आता 85 तर गणांची संख्या 170 पर्यंत वाढली आहे. नुकतीच निवडणूक आयोगाने ही गट व गण रचना अंतिम केली असल्याने आपल्या गट-गणात किती गावे ही बाब आता निश्चित झाल्यानंतर सर्वांचे डोळे गट गणांच्या आरक्षणाकडे लागले होते. गेल्या मंगळवारी निवडणूक आयोगाने आरक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार येत्या 13 जुलैला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. गटांची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर गणांची सोडत संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात निघणार आहे.
मागील पंचवार्षिकला जिल्ह्यातील 73 गटांपैकी 37 गट सर्वसाधारण होते. त्यात आता 29 ने वाढ होऊन सर्वसाधारण जागांची संख्या 66 झाली आहे. या 66 पैकी 33 जागा महिलांसाठी राखीव असतील. मागील वेळी 20 जागा ओबीसींसाठी होत्या. यंदा ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्या जागा सर्वसाधारणमध्ये जोडण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी मागील वेळी नऊ जागा होत्या. त्यात यावेळी दोन ने वाढ होऊन ती संख्या 11 झाल्या आहे. यातही 11 पैकी सहा महिला असतील.
अनुसूचित जमाती संवर्गातही मागील वेळेपेक्षा एक जागा वाढली असून, ही संख्या आठ झाली आहे. त्यात चार महिला असतील अशा प्रकारे 50 टक्के आरक्षणानुसार 43 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. पंचायत समिती गणांच्या जणांच्या ही याच गणितानुसार जागा असतील.
अशी असेल जागांची विभागणी :
प्रवर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती
एकूण गट ८५ १७०
सर्व साधारण ६६ (३३ महिला) १३२ (६६ महिला)
अनुसूचित जाती ११ (६ महिला) २२ (११ महिला)
अनुसूचित जमाती ८ (४ महिला) १६ (८ महिला).