महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता केवळ काही तास शिल्लक असताना आज नालासोपारा येथे विनोद तावडे आणि भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटण्याचे आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आले. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना या पैसवाटपा प्रकरणी घेराव घातला. त्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र निवडणूक आयोगाकडून ती पत्रकार परिषद थांबवण्यात आली. तुलिंज पोलिसांनी या प्रकरणात चार एफआयआर (FIR) दाखल केल्या आहेत.
पोलिसांनी चार FIR केल्या दाखल
हॉटेलमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून पोलिसांनी एकूण चार एफआयआर दाखल केले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये विनोद तावडे आणि भाजपचे नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार राजन नाईक यांच्याविरुद्ध BNS कलम 223 आणि 173, तसेच RP ऍक्टच्या कलम 126 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी 9.53 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
तर दुसऱ्या एफआयआरमध्येही तावडे आणि नाईक यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचे आरोप करण्यात आले आहेत. BNS कलम 223 आणि RP ऍक्टच्या कलम 126 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिसऱ्या एफआयआरमध्ये, विनोद तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर, आणि क्षितिज ठाकूर यांच्यावरही BNS कलम 223 आणि RP ऍक्टच्या कलम 126 अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. चौथ्या एफआयआरमध्ये, आमदार क्षितिज ठाकूर, प्रतीक ठाकूर, आणि अन्य 5-6 जणांवर BNS कलम 118(1), 189(2), 189(3), आणि 115 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुदेश चौधरी यांनी केला मारहाणीचा आरोप
या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते सुदेश चौधरी यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, विवांता हॉटेलमध्ये आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेसंबंधी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या हल्ल्याशी संबंधित गुन्हाही नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
नेमक प्रकरण
नालासोपारा येथील विवांता हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उसळला, जिथे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैशांची बॅग घेऊन येऊन वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. या आरोपांवरून बविआच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड हंगामा केला. त्यांनी तावडे यांना सहा तासांहून अधिक वेळ अडवून ठेवले, त्यांच्यावर पैसे फेकले, आणि भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाणही केली. यावेळी तावडे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, आणि संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडत होता. तावडे यांनी मात्र या आरोपांचे खंडन करत, पैसे वाटपाचा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट केले. भाजपनेही या आरोपांना फेटाळले असले, तरी मतदानाच्या काही तास आधी घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.