पंढरपूरमध्ये भाविकांच्या भावनेशी खेळ! दर्शनासाठी शुल्क घेऊन भक्तांची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पंढरपूर: पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लाखों भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढपरपुरमध्ये येत असतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरमध्ये लाखो वारकरी विठुरायच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये येत असतात. मात्र पंढरपूरमध्ये पालघरमधून दर्शनसाठी आलेल्या एका भविकासोबत फसवणुकीची घटना घडली आहे. ही घटना नेमकी काय आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
पंढरपूरमध्ये पालघरमधून दर्शनसाठी आलेल्या भविकांकडे शुल्क मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचे झाले असे की, कुणाल दिपक घरत, रा. बिलाल पाडा, नाला सोपार पुर्व, ता. वसई जि. पालघर हे भाविक आपल्या कुंटुंबासह सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दर्शनाकरीता आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून 11000 रुपयांची मागणी करण्यात आली. दरम्यान भाविकाकडून दर्शनासाठी शुल्क घेऊन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
संबंधित भाविक हे लवकर दर्शन घेणे कामी मंदिर परिसरात विचारपूस करीत असताना, मंदिराजवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन होण्याकरीता किमान 7-8 तास लागतील असे सांगितले,. दर्शनाकरीता पास मिळतो याबाबत चौकशी करीत असताना, चिंतामणी ऊर्फ मुकुंद मोहन उत्पात, पंढरपूर या इसमाने मी मंदिरात पुजारी आहे, तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवुन आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील असे सांगतिले. त्यानंतर त्याने 5001/- रूपये ची मंदिर समितीची पावती देतो व 6000/- रूपये मला वर द्यावे लागतात असे सांगून रोख रक्कम रुपये 11000 ची मागणी केली. |
भाविकांनी ती मागणी मान्य करत त्यांना ते शुल्क दिले. त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जावून 5001/- रूपये ची भाविकाच्या नावे देणगी पावती करून, संबंधित भाविकाला दिली. त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करीत असताना तेथील पोलीस अधिकारी सपोनि नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता, देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित उत्पात नावाच्या इसमावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम 318 (3) (4) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
पंढरपुर मंदिरामध्ये भाविकांना मिळणार ‘ही’ सुविधा
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे.
अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत.