फोटो सौजन्य - Social Media
शहरातील एसटी स्टॅण्डसमोरील नूतन भाजी मंडईजवळील पार्किंग जागेवर विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटना गेली अनेक वर्षे आपली वाहने उभी करत आहे. मात्र ही जागा अतिक्रमित असल्याने पेण नगरपरिषद प्रशासनाने २८ व २९ मे रोजी पोलीस बंदोबस्तात गाड्या हटविण्याची कारवाई करण्याचे नियोजन केले होते. या कारवाईला विरोध करत विक्रम मिनीडोअर संघटनेने आज नगर परिषद प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन छेडले. संघटनेने हक्काच्या जागेची मागणी करत आंदोलनादरम्यान नगर परिषदेला निवेदन दिले. त्यानंतर मुख्याधिकारी यांच्या दालनात संघटनेच्या प्रतिनिधी व समविचारी लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर नगर परिषद प्रशासनाने कारवाईची तारीख पुढे ढकलून ३ जून २०२५ रोजी निश्चित केली. त्यामुळे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी भाजी मंडई पालिकेने पाच वर्षांपूर्वी बीओटी तत्वावर उभारली आहे. मंडईत जाणारा पदपथ अडवला गेल्याने व्यापारावर परिणाम होतो आहे. मंडईचे रोजचे व्यवहार सुरळीत सुरू राहावेत यासाठी पालिकेला सुमारे दीड कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या जागेवर जनरल पार्किंगसाठी जागा मोकळी करण्यासाठी पालिकेवर वरिष्ठ पातळीवर दबाव आहे.
दुसरीकडे, विक्रम चालक-मालकांचा प्रश्न देखील गंभीर आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, ही जागा पूर्वी टांगा-घोडागाडी आरक्षित होती. बदलत्या काळात त्यांनी मिनीडोअर वाहने खरेदी करून गेली २५ वर्षे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे. त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा ते आमदार, शासकीय अधिकारी आणि सहकार्यांसह मंत्रालयात जाऊन पुढील तीन दिवसांत तोडगा काढण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनावेळी रायगड जिल्हाध्यक्ष विजय पाटील, पेण तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील, उपाध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव सूर्यकांत म्हात्रे, शिवसेना अध्यक्ष समीर म्हात्रे, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे आदींसह शंभरपेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते. तसेच पेण पोलीस निरीक्षक, पालिकेचे अभियंते व अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. सध्या तरी कारवाई लांबणीवर टाकण्यात आली आहे, मात्र हा वाद सुटतो की आणखी चिघळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.