30 हजार स्कूल बससह खासगी बस चालक उद्यापासून बेमुदत संपावर; शाळा, आषाढी वारीवर परिणाम होण्याची शक्यता
राज्यभरात उद्यापासून (1 जुलै) अवजड वाहने आणि खासगी बस चालक व मालकांकडून बेमुदत चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. या संपात मुंबईतील सुमारे 30 हजार शाळांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस सहभागी होणार आहेत. याशिवाय जेएनपीटी परिसरातील 38 हजार कंटेनर वाहतूक करणाऱ्या चालकांचाही यात समावेश आहे. एलपीजी वाहक, पाणी टँकर, शाळा बसेस, प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या खासगी व अवजड वाहनांच्या संघटना या संपात सहभागी होत आहेत.
Anil Ambani: शेअर बाजारात मंदी पण अनिल अंबानीचा ‘हा’ शेअर तेजीत, कुठून मिळाली नवसंजीवनी
या संपामागे वाहन चालक-मालक संघटनांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यात इ-चलन (e-challan) कारवाई तात्काळ थांबवणे, आधी झालेल्या कारवाईंवरील दंड माफ करणे, तसेच वाहनांवर क्लिनर असणे बंधनकारक केल्याचा निर्णय मागे घेणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. वाहन चालकांच्या मते, सध्या RTO आणि पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात ई-चलनद्वारे दंड आकारला जात असून, त्याचा आर्थिक बोजा सहन होण्याच्या पलिकडे गेला आहे. त्यामुळे सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी त्यांची मागणी आहे.
या संपाला ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस, बस अँड कार कॉन्फेडरेशन (दिल्ली), महाराष्ट्र राज्य ट्रक, टँकर, टेम्पो महासंघ, स्कूल बस संघटना, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, एलपीजी ट्रान्सपोर्ट संघटना अशा देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाच्या संघटनांचा पाठींबा मिळाला आहे. यामुळे संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.
या संपामुळे सर्वसामान्यांवर विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि आषाढी वारीच्या तयारीत असलेले वारकरी यांच्यावर मोठा परिणाम होण्याची चिन्हं आहेत. सध्या राज्यात शाळा सुरू झाल्या असून, हजारो विद्यार्थी खासगी स्कूल बसवर अवलंबून असतात. अशावेळी बससेवा बंद पडल्यास त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असून, राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढते आहे. मात्र, बससेवा बंद राहिल्यास त्यांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होईल.
या संपाबाबत काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती. मात्र, संघटनांच्या मागण्या मान्य करण्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. परिणामी, आंदोलनाची वेळ आली असून, सरकारने यावर तात्काळ निर्णय घेतला नाही, तर पुढील काही दिवसांत राज्यभर वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार आणि संघटनांमध्ये तोडगा निघेपर्यंत संप कायम राहणार असल्यामुळे नागरिकांना पर्यायी वाहतुकीची तयारी ठेवावी लागणार आहे.