दिल्लीची 'दबंग' कामगिरी; तेलुगु टायटन्सवर मिळवला सहा गुणांनी रोमहर्षक विजय
पुणे : पूर्वार्धात चार गुणांनी पिछाडीवर असूनही कोणतेही दडपण न घेता दबंग दिल्ली संघाने तेलुगु टायटन्स संघावर ३३-२७ असा रोमहर्षक विजय नोंदविला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दबंग दिल्ली संघाने आतापर्यंत १७ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले होते.
तमिळ थलाईवाज संघावर मात
पुण्यातील लढतींमध्ये त्यांनी तमिळ थलाईवाज संघावर मात केली होती तर युपी योद्धाजविरुद्ध त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली होती. तेलुगू टायटन्स संघाने १८ पैकी दहा सामने जिंकले होते येथे त्यांना जयपूर पिंक पँथर्स, हरियाणा स्टीलर्स या संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. बंगाल वॉरियर्सला त्यांनी दोन गुणांनी हरविले होते त्यामुळे आजच्या लढतीत त्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती.
मध्यंतराला त्यांनी १७-१३ अशी आघाडी
दिल्ली व तेलुगु या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला होता, त्यामुळे बराच वेळ दोन्ही संघबरोबरच होते. सामन्याच्या १२ व्या मिनिटांपासून तेलुगु संघाने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. पंधराव्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण नोंदविला. मध्यंतराला त्यांनी १७-१३ अशी आघाडी घेतली होती.
दिल्लीच्या खेळाडूंची जिद्द
उत्तरार्धात सुरुवातीलाच दिल्ली संघाने पहिला लोण चढवीत १८-१८ अशी बरोबरी साधली. मात्र पुन्हा तेलुगु संघाने आघाडी घेण्यात यश मिळवले. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला त्यांच्याकडे २१-१८ अशी आघाडी होती. तरीही दिल्लीच्या खेळाडूंनी जिद्द सोडली नाही. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना २५-२५ अशी बरोबरी होती. पुढच्याच मिनिटाला दिल्ली संघाने आणखी एक लोण नोंदविला आणि चार गुणांची आघाडी मिळवली. तेलुगु संघाकडून आशिष नरवाल व विजय मलिक यांनी सुरेखा चढाया केल्या तर दिल्ली संघाकडून नवीन कुमार व आशु मलिक यांनी खोलवर चढाया करीत चांगले गडी टिपले.
हेही वाचा : डी गुकेशने भारतासाठी जिंकलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या काही फोटोंवर टाका नजर