पुणे विमानतळावर येताय? तर 'ही' महत्त्वाची बातमी माहिती असणं गरजेचे...
पुणे : सध्या पुण्यासह देशभरात मंकीपॉक्सच्या बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यानुसार, आरोग्य विभाग सतर्क झाला असून, राज्य सरकारकडून आलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. त्यामध्ये कोणी संशयित आढळल्यास त्यांच्यासाठी नायडू रुग्णालयात दहा बेड राखीव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सध्या जगात विविध देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. स्वीडनमध्ये रुग्ण वाढले असून, पाकिस्तानमध्येही एक आढळला आहे. आतापर्यंत जगात २७ हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शेजारच्या पाकिस्तानात एक रुग्ण आढळल्याने भारताचीही चिंता वाढली आहे. आपल्याकडे संसर्ग होऊ नये यासाठी देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाने बैठक घेऊन राज्यांनाही प्रतिबंधात्मक सूचना दिल्या आहेत. मात्र, या संदर्भात केंद्र शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शन सूचना आलेल्या नाहीत. तर प्राथमिक स्वरुपात राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शन सूचन जारी केले आहेत.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, एकजरी संशयित रुग्ण आढळला तरी त्याचा त्या भागात उद्रेक समजून त्या रुग्णाची तपासणी करावी. त्यांचे नमुने (रक्त, रक्तद्रव, पुरळमधील द्रव आणि मूत्र) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) कडे तपासणीला पाठवावेत आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचेही सर्वेक्षण करावे, असे निर्देश दिले आहेत.
‘ही’ आहेत मंकीपॉक्सची लक्षणे
गेल्या तीन आठवड्यांत मंकीपॉक्सबाधित देशांमधून प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे, सुजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी एक किंवा अनेक लक्षणे असल्यास ते मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण समजावेत. त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात जे येतील त्यांना संभाव्य रुग्ण समजावे. तसेच ज्यांचे प्रयोगशाळेत निदान झाले, त्यांना मंकीपॉक्सचे रुग्ण समजण्यात यावे व त्यांच्यावर उपचार व सर्वेक्षण करण्यात यावे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.