पुणे : अग्निशमन दलाचे जवान नेहमीच आपल्या प्राणांच्या बाजी लावून जीव वाचवतात असतात. पूर असो, आग असो वा कोणतेही संकट असो…संकटमोचक म्हणून अग्निशमन दलाचे जवान नेहमीच तप्तरतेने मदत करतात. पुण्यामध्ये याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे, ड्युटीवर जात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने आपले कर्तत्व बजावले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता जवानाने स्वतः जवळ कोणतेही सामान नसताना आग विझवण्यात यश मिळवले. ही घटना पुण्यामध्ये आज (दि.03) दुपारच्या सुमारास घडली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पद्मावती चौक येथे एका दुचाकीने पेट घेतला होता. ही एक इलेक्ट्रिक दुचाकी होती तिच्यामध्ये असणाऱ्या बॅटरीने अचानक पेट घेतला. ही गोष्ट मालकाच्या निदर्शनास येताच रस्त्यावर एकच आरडाओरडा सुरु झाला होता.
त्याचवेळी तेथून दुपारच्या पाळीसाठी ड्युटीवर जाणारे मदतनीस फायरमन मंदार संतोष नलावडे (राहणार – भिलारेवाडी, पुणे) यांनी ही घटना पाहिली. ते गंगाधाम अग्निशमन केंद्रामध्ये ड्युटीसाठी येत होते. रस्त्यावर आरडाओरड पाहिल्यानंतर मंदार मदतीला धावून आले. आग लागली असल्याची ही घटना पाहताच त्यांनी तातडीने क्षणाचा ही विलंब न करता मदतीला सुरुवात केली. घटना घडली त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही साहित्य नव्हते. पण हार मानेल तो जवान कसला. आपला हजरजबाबी दाखवत त्यांनी आग आटोक्यात आणलीच. घटना घडली त्याठिकाणी समोर असलेल्या इराणी हॉटेलमधील अग्निरोधक उपकरण होते. (Fire Extinguisher) धावत जाऊन घेत लगेचच पेटलेल्या दुचाकीवर मारुन क्षणातच आग आटोक्यात आणली. आणि भर रस्त्यावर सुरु असलेल्या हा थरार संपवत धोका दूर केला.
जवान मंदार नलावडे यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दुचाकी मालक व त्यांच्या मित्रपरिवाराने या कामगिरीबद्दल जवानाचे आभार मानले. तसेच दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांना ही भ्रमणध्वनी करुन अग्निशमन दलाच्या कामकाजाबाबत मोठे समाधान व्यक्त केले. अग्निशमन प्रमुख यांनी ही मंदार नलावडे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे आणि प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी हानी टळली. त्यामुळे ड्युटीवर असो किंवा नसो जवान नेहमी कार्यतप्तर असतो याचा पुन्हा एकदा पुण्यात प्रत्यय आला.