
Pune Municipal Election 2026: पुणे महापालिका निवडणूक 2026 / Pune Municipal Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. युतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये बैठका, जागावाटप आणि उमेदवारांबाबत चर्चा देखील पार पडल्या होत्या. मात्र अपेक्षित जागा न मिळाल्याने पुण्यात भाजप–शिवसेना युती फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, पुण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार नसून शिवसेना ही महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. भाजपकडून केवळ 16 जागांची ऑफर देण्यात आल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते नाना भानगिरे यांनी दिली आहे.
दरम्यान, जागावाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यात शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात येणार होते. मात्र उदय सामंत पुण्यात येण्याअगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेत युतीविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप–शिवसेना युती फिस्कटल्याने पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यात युती फिस्टकल्यानंतर शिवसेनेकडून सर्व १६५ जागांवर लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कार्यकर्त्यांसाठी युतीत लढणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिलेजातील, अशी माहिती नाना भानगिरे यांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणुकां जाहीर झाल्यानंतर पुण्यात भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार असल्याचे असल्याचे जवळपास निश्चित झाले होत. पण दोन्ही पक्षांतील चर्चा इतक्या ताणल्या गेल्या की युती तुटण्यापर्यंत आली होती. सुरुवातीला भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १५ जागांची ऑफर दिली होती. वाटाघाटीनंतरही भाजपने शिवसेनेला केवळ १५ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पण १६५ पैकी फक्त १५ जागां दिल्याने शिंदेच्या शिवसेनेत नाराजीचा सूर उमटू लागला. इतकेच नव्हे तर ज्या जागांवर शिवसेना किंवा भाजप निवडून येऊ शकत नाही, अशा जागा देऊ केल्याने अखेर शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
Pune Election : महायुतीमध्ये एकमत नाहीच; पुण्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला किमान 25 जागा मिळाव्यात, असा आग्रह शिवसेनेकडून धरण्यात आला होता. मात्र भाजपकडून अपेक्षेप्रमाणे सन्मानपूर्वक जागावाटप न झाल्याने युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जोपर्यंत भाजप सन्मानपूर्वक जागा देत नाही, तोपर्यंत युती होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून मांडण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर अखेर पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याची अधिकृत घोषणा आज शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षांकडून करण्यात आली आहे. यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या मतभेदांमुळे ही युती फिस्कटल्याचे सांगण्यात येत असून, याचा थेट परिणाम पुण्यातील राजकीय समीकरणांवर होणार आहे. युती तुटल्याने आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.