मालेगावी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा
महापालिकेच्या २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट व भाजपच्या युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. गेल्या वीस वर्षांत शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपमध्ये काट्याची टक्कर झाली आहे.
महाविकास आघाडीसोबत काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या उमेदवारांचा फॉर्मुला निश्चित झाला आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागात तिरंगी लढत होणार आहे. या राजकीय घडामोडीमुळे महापालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.
यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच वरिष्ठ स्तरावरून युती करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. शहराच्या पश्चिम भागातील हिंदू बहुल भागातून २१ नगरसेवक निवडून जातात. या निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्मुला कसा झाला याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान, या युतीमुळे भाजपमधील नेते व शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे राजकीय विरोधक बंडूकाका बच्छाव यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मनपा निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे भूमिका घेतली आहे. भाजप उमेदवारांना बाहेरून पाठिंबा देईल मात्र प्रचारसभा व प्रचारात प्रत्यक्ष सहभागी
होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर युवा नेते अद्वय हिरे यांनी देखील युतीचा निर्णय झाल्यानंतर नाराजी दर्शवत मालेगाव मनपाच्या निवडणुकीतून काढता पाय घेतल्याचे दिसून येत आहे. हिरे सोमवारी (दि.२९) नाशिक येथे त्यांच्या भावजाई योगिता हिरे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
मंत्री भुसे यांचे विरोधक व भाजपचे नेते डॉ. तुषार शेवाळे यानी सावध भूमिका घेतली आहे. गेल्या वीस वर्षाच्या निवडणुकीत शिवसेनेशी टक्कर दिलेले भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणारे माजी गटनेते सुनील गायकवाड यांच्याकडे असणाऱ्या इच्छुकांची संख्या बधता गायकवाड यांची राजकीय कोंडी झाली आहे, गायकवाड यांनी स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, भाजपच्या उमेदवारांसाठी काम करू अशीही भूमिका त्यानी घेतली आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिका-यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणुकीचा निकाल उलटसुलट लागला तर स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या वरिष्ठांना सोडणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
या राजकीय घडामोडीमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यामध्ये अंतर्गत मतभेद व गटबाजी दिसून येत आहे. तर शिवसेनेतही नाराजीनाट्य रंगले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे अखेरच्या दिवशी कोणाला उमेदवारी देतात याकडे शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकत्यांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेतही मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेनेपुढे बंडखोरी रोखण्याची मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारनंतर माधारीच्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. शहराव्या पूर्व भागात एमआयएम व काँग्रेसच्या युतीची चर्चा आता थांबली आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी एमआयएमसोबत युती न करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस व एमआयएम स्वतंत्र लढणार आहे.






