
Pune Post Office, Parcel Pick Up Service Pune,
Pune Post Office: बदलत्या डिजिटल युगाशी पाऊलमिळवणी करत पुणे टपाल विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नातेवाईकांना किंवा व्यवसायानिमित्त इतर शहरांत पार्सल पाठवण्यासाठी आता नागरिकांना टपाल कार्यालयाच्या (पोस्ट ऑफिस) वाऱ्या करण्याची गरज उरणार नाही.
ग्राहकांच्या थेट घरातून, कार्यालयातून किंवा व्यावसायिक ठिकाणावरून पार्सल स्वीकारून ते देशाच्या कानाकोपऱ्यात सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी पुणे टपाल विभागाने ‘पार्सल पिक-अप सेवा आपल्या दारी’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. पुणे टपाल विभागाच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल आणि टपाल सेवेचे संचालक अभिजित बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी या महत्त्वाकांक्षी सेवेचा रीतसर शुभारंभ करण्यात आला.
या नव्या सुविधेमुळे ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर टपाल विभागाचे अधिकृत कर्मचारी थेट दिलेल्या पत्त्यावर येतील आणि पार्सल ताब्यात घेतील. तिथेच त्याची रीतसर नोंदणी करून अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने ते पार्सल देशभरात योग्य त्या ठिकाणी रवाना केले जाईल. या सुविधेमुळे नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही, ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ आणि प्रवासाचा नाहक खर्च वाचणार आहे. पार्सल पाठवण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आता अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.
या योजनेची माहिती देताना पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल म्हणाल्या, “बदलत्या काळाची पावले ओळखून ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेत टपाल विभाग सातत्याने स्वतःमध्ये आधुनिक बदल करत आहे. ही ‘पार्सल पिक-अप सेवा’ त्याचाच एक भाग असून ग्राहकांना जास्तीत जास्त डिजिटल व घरपोच सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
टपाल सेवेचे संचालक अभिजित बनसोडे म्हणाले की, ही योजना घरगुती ग्राहकांसह प्रामुख्याने किरकोळ व्यापारी, लघु उद्योजक, ई-कॉमर्सद्वारे ऑनलाईन वस्तू विकणारे व्यावसायिक, घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
आपल्या घरातून किंवा कार्यालयातून पार्सल उचलण्यासाठी टपाल विभागाने दोन विशेष संपर्क क्रमांक जारी केले आहेत. नागरिक या क्रमांकांवर फोन करून किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवून आपली नोंदणी करू शकतात:
परिसर १: पिंपरी-चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी, येरवडा, हिंजवडी, हडपसर, एनआयबीएम, कोंढवा, भोसरी, मार्केट यार्ड.
संपर्क क्रमांक: ८४२१३७२३१७
परिसर २: लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, डेक्कन, औंध, धनकवडी, नांदेड सिटी, कोथरूड.
संपर्क क्रमांक: ७०२८००७२२३
ही विशेष सेवा पुणे शहरातील संबंधित टपाल कार्यालयांच्या माध्यमातून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. पुणेकरांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.