पुणे : पुण्यातील विमानतळ परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचे दिसून आल्याने प्रियकराने तिचा भररस्त्यात गळा दाबून चाकूने सपासप वार (Knife Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पसार झालेल्या प्रियकराला अटक केली.
ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय २२, रा. बेंद्रे बिल्डिंग, संघर्ष चौक, चंदननगर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या दोघांची गेल्या काही महिन्यांपासून मैत्री आहे. पण, दोन महिन्यांपासून त्यांच्यातील बोलणे बंद झाले आहे. तरूणी त्याचा फोन देखील उचलत नाही. तर, भेटत देखील नाही. याचा राग त्याच्या मनात होता. याचदरम्यान, तरूणी दुसऱ्या एका मुलासोबत त्याला दिसून आली. यादरम्यान, शुक्रवारी दुपारी तरूणी पुणे-नगर रस्त्यावरील खुळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरूणीला गाठले.
तसेच, दुसऱ्या मुलाशी बोलत असल्यावरून वाद घातला. वादातूनच त्याने रागाच्या भरात तिचा गळा दाबला आणि खिशात आणलेल्या चाकूने तिच्या पाठीत, छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. तरूणी भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ज्ञानेश्वर तेथून पसार झाला. हा प्रकार समजताच विमानतळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांनी तपासाच्या सूचना देऊन आरोपीला शोधण्यासाठी पथक रवाना केले.
त्यावेळी तो लपून बसलेल्या ठिकाणाची माहिती पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने ज्ञानेश्वार याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने दुसऱ्या मुलाशी बोलत असल्यावरून वार केल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.