सौजन्य - नवराष्ट्र टीम
चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत तक्रारी आणि आरोप समोर आल्यानंतर सुरवसे-पाटील यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. कार्यालयातील कागदपत्रांची हाताळणी, कामकाजाची पद्धत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी हवेली क्रमांक आठच्या सहायक दुय्यम निबंधक वर्ग-२ संगिता कुरळे (पवार) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता चंदननगर कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी होणार आहे.
दरम्यान, चौकशी समिती गठित झाल्यानंतरही सुरवसे-पाटील यांनी चौकशीच्या निष्पक्षतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी समकक्ष अधिकाऱ्यांमार्फत न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘चौकशी केवळ औपचारिकता ठरू नये. संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी केली. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या चौकशीत नेमके काय समोर येते आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






