भिगवण : मुलाचा अभ्यास घेत असताना पती ओरडल्याच्या कारणावरून एका २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Bhigwan) केल्याची घटना भिगवण येथे घडली. याबाबतची माहिती भिगवण पोलिसांनी दिली.
रोहिणी राकेश थोरात (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पती राकेश थोरात यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी राकेश थोरात कामावरून घरी आले. त्यावेळी पत्नी रोहिणी या मुलाचा अभ्यास घेत होत्या. तर मुलगा राघव हा अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी त्याला हाताने मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे राकेश याने रोहिणीला ‘तू अभ्यासासाठी मुलाला का मारते, त्याचा अभ्यास तो करेल’, असे सांगितले.
त्यावर चिडलेल्या रोहिणी हिने ‘आता याचा अभ्यास तुम्हीच घ्या’, असे रागाने म्हणत घरात जाऊन दरवाजा बंद केला. बराच वेळ होऊनही दरवाजा न उघडल्याने मनात शंका निर्माण झाल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहिणी हिने घराच्या छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.