खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात 'पुनीत बालन' ग्रुप आघाडीवर; पॅरा ऑलिंपिक विजेत्या सचिनला ५ लाखांचे बक्षीस
पुणे: पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत गोळा फेकमध्ये या स्पर्धेत भारताला सिल्व्हर मेडल मिळवून देणाऱ्या खेळाडूला सचिन खिलारीला युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती खिलारी आणि सरगर यांच्या हस्ते झाली. यावेळी पुनीत बालन यांनी ही घोषणा केली. ‘पुनीत बालन ग्रुप’कडून विविध खेळांच्या विविध स्पर्धांतसेच खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. अनेक खेळांडूना आर्थिक मदतही केली जाते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदक मिळविणाऱ्या स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षीसही ‘पुनीत बालन ग्रुप’कडून देण्यात आले. पॅरिसमध्ये पार पडलेल्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल विजेत्या सचिन खिलारी आणि भाला फेक स्पर्धेत कांस्य पदकाने हुलकावणी दिलेल्या संदीप सरगर यांना प्रोत्साहान देण्यासाठी पुनीत बालन यांनी अनुक्रमे ५ व २ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. यावेळी दोन्ही खेळाडूंनी पुनीत बालन यांचे आभार मानले तर या खेळाडूंनी आगामी काळात चांगली कामगिरी करून भारत देशाला पदके मिळवून द्यावीत, अशी प्रार्थना पुनीत बालन यांनी गणपती बाप्पाकडे केली.
सचिन खिलारीने जिंकले रौप्य पदक
मराठमोळ्या सचिन खिलारी याने गोळाफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करागणी या छोट्याशा गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पुरुषांच्या गोळाफेक इवेंटमधील F46 प्रकारात त्याने भारतासाठी रौप्य पदक पटकावले.
हेही वाचा: मराठमोळ्या सचिनने गाजवले पॅरिसचे मैदान; पॅरालिम्पिक गोळाफेकमध्ये जिंकले रौप्यपदक
अंतिम फेरीत सचिन याने १६.३२ मीटर अंतर गोळा फेकून पदकाची आपली दावेदारी भक्कम केली होती. कॅनडाच्या ग्रेगनं १६.३८ मीटर गोळा फेकत ‘सुवर्ण’ पदकाला गवसणी घातली. सचिन खिलारी हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आहे. दरम्यान, नववीच्या वर्गात शिकत असताना सायकलवरून पडल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. गँगरिनमुळे डाव्या हाताच्या कोपराच्या खालील भागाला कायमस्वरुपी अपंगत्व आले होते. पॅरा क्रीडा प्रकारात आधी तो भालाफेक प्रकारात खेळायचा. पण खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर सांगलीच्या या पठ्ठ्यानं हार न मानता गोळाफेक प्रकारात भाग घेण्याचा निर्णय घेतला. जागतिक स्पर्धेत भारताची मान अभिमानानं उंचावणाऱ्या सचिननं पॅरिस येथील पॅरालिम्पिकमध्येही कमाल करून दाखवली.