विमानतळावर टपाल सेवांना अधिक वेग(फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुणे विमानतळ परिसरातील टपाल सेवा अधिक कार्यक्षम आणि समन्वयपूर्ण करण्यासाठी रेल डाक सेवा (आरएमएस) ‘बी’ मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत एअरपोर्ट ट्रान्झिट मेल ऑफिस या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयामुळे टपाल विभाग आणि विमानतळ प्रशासनातील समन्वय अधिक मजबूत होऊन विमानतळाशी संबंधित टपाल सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन निदेशक डाक सेवा अभिजित बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, संयुक्त जनरल प्रबंधक प्रदीप कुमार सिंह, तसेच आरएमएस ‘बी’ विभागाचे अधीक्षक बी. पी. एरंडे तसेच टपाल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नवीन एअरपोर्ट ट्रान्झिट मेल ऑफिस कार्यालयामुळे विमानतळाशी संबंधित टपाल सेवांचे नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या सुविधेमुळे संवाद आणि कार्यप्रणाली अधिक सुलभ होऊन टपाल सेवेचे कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
हेदेखील वाचा : Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
याशिवाय, या ठिकाणी सर्व प्रकारच्या पोस्टल आर्टिकल्स व पार्सल बुकिंगसाठी नवीन काउंटर सुरू करण्याचेही नियोजन असून, येत्या काही दिवसांत ही सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरातील नागरिक, प्रवासी आणि व्यावसायिकांना टपाल व पार्सल सेवा अधिक सुलभपणे मिळणार आहेत. या उपक्रमामुळे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि टपाल सेवा अधिक सुधारण्यास मदत होईल, असे मत निदेशक डाक सेवा अभिजीत बनसोडे यांनी व्यक्त केले. सहायक अधीक्षक गणेश वडूरकर यांनी आभार मानले.






