Pune Airport: Air services on 15 new routes from Lohegaon Airport soon: Muralidhar Mohol
पुणे : लोहगाव विमानतळावरून सध्या ३७ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असून, यात लवकरच १५ नवीन मार्गांची भर पडणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली असून, यामुळे पुणेकरांसाठी हवाई प्रवासाचे आणखी पर्याय उपलब्ध होणार आहेत. पुणे विमानतळाला मंजूर झालेल्या १५ नवीन स्लॉटसाठी मार्गांची निश्चिती करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर या नवीन मार्गांवरून विमानसेवा सुरू होईल, असे मोहोळ यांनी सांगितले.
या विस्ताराबाबत बोलताना राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे हे एक महत्त्वाचे शहर असून, येथील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवणे ही आमची प्राथमिकता आहे. लवकरच पुणे विमानतळावरून १५ नवीन मार्गांवर विमानसेवा सुरू होईल, ज्यामुळे पुणे आणि आसपासच्या नागरिकांना देशातील विविध शहरांशी जोडणी साधणे अधिक सोयीचे होईल. यामुळे पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळेल.”
सध्या पुणे विमानतळावरून देशातील ३७ प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. नवीन १५ मार्गांच्या समावेशामुळे पुणे विमानतळाची क्षमता आणि कनेक्टिव्हिटी लक्षणीय वाढणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता येईल. ही वाढती हवाई कनेक्टिव्हिटी पुणे शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही गती देईल अशी अपेक्षा आहे.
या नव्या मार्गांमध्ये जयपूर, गुवाहाटी, श्रीनगर, देहरादून, रांची, जबलपूर, अमृतसर, सूरत, वडोदरा, कोझिकोड, त्रिवेंद्रम,भुवनेश्वर आणि मोपा विमानतळ यांसारख्या शहरांचा समावेश होण्याची शक्यता आहे. काही मार्गांवर सध्या असलेल्या सेवांची वारंवारिता वाढवण्याचेही नियोजन आहे.
हेही वाचा : AI Day 2025:आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयुष्य सुखकर करण्यासाठी मात्र…; काय म्हणाल्या अंजली देशमुख?
पुणे विमानतळावरून दररोज सरासरी २०० विमानांची वाहतूक होते.दररोज सुमारे ३५ हजार प्रवाशांची वाहतूक होते. औद्योगिक, शैक्षणिक, संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचे असलेल्या पुण्याहून थेट विमानसेवांची वाढ ही शहराच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरत आहे.