आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( फोटो-istockphoto)
प्रगती करंबेळकर/ वैष्णवी सुळके: कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी क्षमतेचा पर्याय नसून मानवी बुद्धीमत्तेने विकसित केलेले एक मानव उपयोगी तंत्रज्ञान आहे. ज्याचा योग्य वापर केल्यास आयुष्य अधिक सोयीचे आणि सुखकर होते. मात्र, त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, असे मत कमिन्स कॉलेजच्या ऑफ इंजिनियरिंगच्या कम्पुटर विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक अंजली देशमुख यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिनानिमित्ताने व्यक्त केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिनानिमित्त ‘नवराष्ट्रने अंजली देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या जगात तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॅलक्युलेटर आणि संगणक आले तेव्हाही लोकांमध्ये भीती होती की माणसाची कामे बंद होतील, नोकऱ्या जातील, पण तसे झाले नाही. तंत्रज्ञानाने मानवी क्षमतेला अधिक बळकटी दिली. त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ताही माणसाचा शत्रू नाही, ती त्याची सोबती आहे. मात्र त्याचा योग्य व प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. शिक्षण, संगणक प्रोग्रामिंग, वैद्यकीय तपासणी, निसर्ग निरीक्षण, छायाचित्रण, चित्रकला, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग होत आहे. कोडिंगसारख्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने गती येते. आजारांचे निदान करणाऱ्या प्रणालींपासून दिव्यागांच्या सोयीसुविधांपर्यंत याचा वापर होतो. माहिती सहज, जलद आणि अचूक मिळवण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरते.
अजूनही अशी अनेक साधने आहेत, जी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. छायाचित्रण व रेखाचित्रांसाठी मिडजर्नीसारखी आधुनिक साधने अजूनही मर्यादित लोकांपर्यंतच आहेत. तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जेणेकरून गावागावात आणि सर्व स्तरांवर त्याचा लाभ घेता येईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता शिकण्यासाठी आज अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये ‘एनपीटीईएल’ या अभ्यासक्रमांतर्गत कोर्सेस घेण्यात येतात. तेथे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, ती कशी कार्य करते, तिचा योग्य उपयोग कसा करता येईल, याचे शिक्षण दिले जाते. याशिवाय अनेक ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम आणि विशेष अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे मानवी विचारशक्ती खुंटित होऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. माणूसच तंत्रज्ञानाला दिशा देतो, त्यामुळे तंत्रज्ञानावर पूर्ण अवलंबून राहून आपली विवेकबुद्धी हरवू नये. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी मानवी संवेदनशीलता, अनुभव आणि निर्णयक्षमता ती गाठू शकत नाही. त्यामुळेच तिचा उपयोग आपली क्षमता वाढवण्यासाठी, कामे सुलभ करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी करावा.
शासनानेही या क्षेत्रासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. परदेशात जसे सुरक्षा आणि बौद्धिक संपदेचे संरक्षण करणारे कायदे आहेत, तसेच कायदे भारतातही काही प्रमाणात याबाबतचे कायदे आहेत परंतू यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखता येईल आणि बौद्धिक संपदेचा प्रभावी वापर करता येईल.