पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची तयारी
Pune MLC Election : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दोन दिवसीय पुणे विभागीय दौरा केला. या दौऱ्यात भाजप-महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य संमेलनातून पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील भाजप कोअर कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये मतदार नोंदणी मोहीम अधिक प्रभावी करणे, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करणे आणि प्रचार यंत्रणा सक्षम करण्याबाबत चर्चा झाली.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक समन्वय वाढवण्याच्या सूचना दिल्या. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर या बैठकींमध्ये भर देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याची मागणी करणारे निवेदन संघाच्या वतीने सादर करण्यात आले.
या बैठकीदरम्यान संघाने पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील बैठकांदरम्यान अपक्ष उमेदवार नंदकुमार सागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप-महायुतीला समर्थन जाहीर केल्याची माहिती देण्यात आली. तसेच पुण्यातील कार्यकर्ता संमेलनात भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने शरद लाड यांना प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
“युवा वर्गाला शिक्षण, करिअर आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उन्नतीच्या संधी मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-महायुती सरकार कटिबद्ध आहे,” असे रविंद्र चव्हाण म्हणाले. शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे सांगत त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढील काही दिवस पूर्ण ताकदीने प्रचार करण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यातील बैठकांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या दोन दिवसीय दौऱ्यातून पुणे विभागातील निवडणूक तयारी, जिल्हानिहाय समन्वय, मतदार नोंदणी आणि बूथस्तरीय नियोजनाला प्राधान्य देण्यात आल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. आता या तयारीचे प्रत्यक्ष निवडणुकीत कसे रूपांतर होते, याकडे लक्ष लागले आहे.






