अखेर दहा वर्षांच्या सेवेनंतर पुण्याचा 'संकटमोचक' निवृत्त; महत्वाच्या मिशनमध्ये 'तेजा'ने बजावली उत्कृष्ट कामगिरी
पुणे: शहर पोलीस दलातील महत्वाची कामगिरी अन् जबाबदारी पार पाडणारा ‘तेजा’ अखंड सेवेनंतर निवृत्त झाला. तेजाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात आपली चोख कामगिरी पार पाडली. त्याच्या निवृत्तीवेळी त्याच्या हँडलेर अन् इतरांना अश्रू अनावर झाले होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्याला निरोप देण्यात आला आहे. त्याने दहा वर्ष शहर पोलीस दलाच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा केली. तेजाच्या निवृत्तीचा सोहळा शिवाजीनगर येथील बाॅम्बशोधक-नाशक पथकाच्या कार्यालयात नुकताच पार पडला.
पोलीस दलात श्वान महत्वाची भूमिका बजावतात. बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपासात त्यांचे महत्व विशेष असते. पुणे बाॅम्ब शोधक-नाशक पथकात तेजा गेल्या दहा वर्षापासून कर्तव्य बजावत होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, संशयित वस्तू, स्फोटकांची तपासणी, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची नियमित तपासणी तसेच गंभीर गु्न्ह्यांच्या तपासात तेजा सहभागी होता. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांचा बंदोबस्त, पालखी, गणेशोत्सव बंदोबस्तात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. जी-२० परिषद व शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात त्याने योगदान दिले.
प्रशिक्षणानंतर सेवेत समावेश
तेजाचा जन्म दि. ११ जानेवारी २०१५ रोजी तेजाचा जन्म झाला. नंतर महिनाभरात पुणे पोलिसांच्या बाॅम्बशोधक-नाशक पथकात तो सहभागी झाला. शिवाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) श्वान प्रशिक्षण केंद्रात तेजाचे प्रशिक्षण पुर्ण झाले. सहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर लॅब्रोडोर जातीचा तेजा बाॅम्बशोधक-नाशक पथकाच्या सेवेत रुजू झाला, अशी माहिती बाॅम्बशोधक-नाशक पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. जी. येळे यांनी दिली. प्रशिक्षण कालावधीपासून उपनिरीक्षक सलीम शेख, हॅण्डलर सहायक फौजदार अविनाश श्रीमंत, हवालदार किसन ढेंगळे यांनी तेजाचा सांभाळ केला.
गावठी बॉम्ब शोधून दुर्घटना टाळली
तेजाच्या निवृत्तीनंतर पथकाची धुरा विराट, राणा, ध्रुवा, राकी, आझाद, वीर, शौर्य या श्वानांवर आहे. वीर आणि शौर्य यांचा पथकात नव्याने समावेश करण्यात आला असून, त्यांना श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी भोसरीतील दिघी रस्त्यावर एका घरासमोर रानडुकराच्या शिकारीसाठी वापरले जाणारे गावठी बाॅम्ब फेकून दिले होते. एका बालिकेने खेळता-खेळता चेंडू समजून एक हातबाॅम्ब हातात घेतला व स्फोटात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीडीडीएसचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्या वेळी झुडपांत टाकून दिलेले गावठी बाॅम्ब तेजाने शोधून काढले होते, अशी आठवण बाॅम्बशोधक-नाशक पथकातील हॅण्डलर अविनाश श्रीमंत यांनी सांगितली.
श्वानाचा सांभाळ
बाॅम्बशोधक-नाशक पथकातील श्वानांचा मायेने सांभाळ करण्यात येतो. श्वान आजारी पडले, तर त्यांचा सांभाळ करणाऱ्या हस्तकांना झोप येत नाही. पोटच्या मुलाप्रमाणे श्वानांची काळजी घेतली जाते. साधारणपणे दहा वर्षांच्या सेवेनंतर श्वान निवृत्त होते. निवृत्तीनंतर त्याला श्वानप्रेमी किंवा संस्थेकडे सोपविले जाते. तत्पूर्वी त्यांच्या पात्रतेचे निकष पूर्ण केले जातात.