

पुण्यात सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खाजगी वाहनांना प्राधान्य
९४ टक्के नागरिकांना जवळ सार्वजनिक वाहतूक
नियमित बससेवेची उपलब्धता अवघी २१ टक्के
पुणे शहर प्रतिनिधी : वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि वायुप्रदूषणामुळे पुण्याच्या रस्त्यांवरील प्रवास दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक, सायकल आणि पायी चालण्याला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात मेट्रो आणि पीएमपीएमएलच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वाढले असले, तरी खासगी वाहनांवरील नागरिकांचे अवलंबित्व कायम आहे. सार्वजनिक वाहतूक जवळ उपलब्ध असूनही तिची नियमितता आणि जोडसेवेचा अभाव ही शाश्वत वाहतुकीसमोरील प्रमुख आव्हाने ठरत आहेत.
जागतिक शाश्वत वाहतूक दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर) पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतल्यास ही तफावत प्रकर्षाने जाणवते. 'पीपल नियर ट्रान्झिट' (पीएनटी) २०२६ या अभ्यासानुसार, दोन्ही शहरांतील ९४ टक्के लोकसंख्येला चालत जाण्याच्या अंतरावर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, केवळ २१ टक्के लोकसंख्येला पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर वारंवार बससेवा मिळते. २०१९ मध्ये हे प्रमाण ६६ टक्के होते. पुण्यातील बाणेर, धानोरी, धायरी, हडपसर, कोंढवा, कोथरूड, आंबेगाव आणि वडगाव शेरी या भागांत बससेवेची वारंवारता वाढविण्याची गरज अभ्यासातून अधोरेखित झाली आहे.
दुसरीकडे, पुणे मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असला, तरी मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठीची जोडसेवा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बस, रिक्षा आणि सायकल यांची मेट्रोशी प्रभावी सांगड घातल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो. पॅरिसर संस्थेच्या नोव्हेंबर २०२६ मधील अभ्यासात सायकल भाड्याने वापरण्यास ५५ टक्के, तर सामायिक रिक्षांचा वापर करण्यास ७५ टक्के प्रवाशांनी तयारी दर्शविली आहे.
संसदेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन; पण कारण काय? किरेन रिजिजू यांची घोषणा
पीएमपीएमएलच्या बससेवेची वारंवारता, बसची उपलब्धता आणि मेट्रोशी जोडमार्ग यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सुरक्षित पादचारी मार्ग, सलग सायकल मार्ग आणि सामायिक रिक्षांसाठी निश्चित थांबे विकसित करणे गरजेचे आहे. केवळ सार्वजनिक वाहतुकीचे जाळे विस्तारून चालणार नाही, तर नागरिकांना घरापासून इच्छित स्थळापर्यंत सुरक्षित, परवडणारा आणि वेळेत पोहोचविणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे हीच शाश्वत वाहतुकीची खरी कसोटी ठरणार आहे.
वास्तुविशारद आणि वाहतूकतज्ज्ञ प्रांजली देशपांडे म्हणाल्या, "पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत असले, तरी त्याला पूरक ठरणाऱ्या बससेवेचा विस्तार अपेक्षित वेगाने होत नाही. शहरात ४ हजार ५०० बस उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. खासगी वाहनांचा वापर कमी करायचा असल्यास पार्किंगसाठी शुल्क आकारणे आवश्यक आहे. तसेच, सायकल प्लॅन आणि अर्बन स्ट्रीट डिझाइन गाईडलाइन्सनुसार प्रमुख रस्त्यांवर सलग पदपथ आणि सायकल मार्ग विकसित करणे गरजेचे आहे."
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील किती टक्के लोकसंख्येला सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे?
पीएनटी २०२६ च्या अभ्यासानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ९४ टक्के लोकसंख्येला चालत जाण्याच्या अंतरावर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे.
पुण्यात किती टक्के लोकांना पाच मिनिटांच्या अंतरावर वारंवार बससेवा मिळते?
अभ्यासानुसार, केवळ २१ टक्के लोकसंख्येला पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर वारंवार बससेवा मिळते. २०१९ मध्ये हे प्रमाण ६६ टक्के होते.
पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?
पीएमपीएमएल बससेवेची वारंवारता वाढवणे, मेट्रो स्थानकांपर्यंत जोडसेवा उपलब्ध करणे, सुरक्षित पादचारी मार्ग आणि सलग सायकल मार्ग विकसित करणे आवश्यक आहे. सामायिक रिक्षांसाठी निश्चित थांबे निर्माण करणेही महत्त्वाचे आहे.