राहुल गांधींचं नाव घेताच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पोस्ट ब्लॉक? काँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

राहुल गांधींचे नाव किंवा फोटो असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पोस्ट भारतात ब्लॉक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मनु जैन यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेत IT Rules 2021 च्या नियम 4(4) ला आव्हान दिले आहे.
काँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका
काँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिकाकाँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका
Published on: 
Updated on: 
  • राहुल गांधींच्या नावाने आणि फोटोने पोस्ट ब्लॉक?

  • निमंत्रणापासून श्रद्धांजलीपर्यंतच्या पोस्टवर कारवाई

  • IT Rules 2021 च्या नियम 4(4) ला न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एखाद्या नेत्याचं नाव घेतलं किंवा त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला म्हणून पोस्टच ब्लॉक होत असेल, तर हा नक्कीच चर्चेचा विषय ठरतो. सध्या काँग्रेस आणि सोशल मीडिया कंपनी मेटा यांच्यात असाच एक वाद समोर आला आहे. राहुल गांधी यांचे नाव किंवा फोटो असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पोस्ट भारतात ब्लॉक केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी इंडियन यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मनु जैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मनु जैन यांच्या याचिकेनुसार, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी शेअर केलेल्या अनेक पोस्ट भारतात पाहता येणार नसल्याच्या नोटिसा मिळाल्या. 29 सप्टेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात अशा अनेक घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका
Supreme Court on Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना मोठा दिलासा! 'त्या' प्रकरणातील चौकशीचे आदेश रद्द

निमंत्रणापासून श्रद्धांजलीपर्यंतच्या पोस्टवर कारवाई

या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे ब्लॉक झालेल्या पोस्ट केवळ राजकीय स्वरूपाच्या नव्हत्या. राहुल गांधी यांना लग्नाचं निमंत्रण देणारी पोस्ट, वाढदिवसाच्या शुभेच्छा, माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली आणि राहुल गांधींसोबतचे कार्यकर्त्यांचे फोटोही यात असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

एवढंच नाही, तर शिकागो विद्यापीठातील राहुल गांधी यांच्या भाषणाशी संबंधित पोस्टही ब्लॉक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व पोस्टमध्ये राहुल गांधी यांचं नाव किंवा फोटो ही समान बाब असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.

IT Rules 2021 च्या नियम 4(4) ला आव्हान

या प्रकरणात मनु जैन यांनी माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मधील नियम 4(4) ला आव्हान दिलं आहे. या तरतुदीनुसार मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आधी कायदेशीररीत्या ब्लॉक केलेल्या कंटेंटशी अगदी तंतोतंत जुळणारा मजकूर ओळखण्यासाठी ऑटोमॅटिक तंत्रज्ञान वापरणं बंधनकारक आहे.

कोणत्या सरकारी आदेशावर पोस्ट हटवल्या?

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पोस्ट ब्लॉक करताना नेमका कोणता सरकारी आदेश वापरण्यात आला, याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि मेटाने संबंधित आदेश, नोटिसा आणि वापरलेल्या कीवर्ड्सचा खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 8 आणि 10 ऑक्टोबरच्या ॲडव्हायझरींनाही याचिकेत आव्हान देण्यात आलं आहे.

दरम्यान, पोस्ट ब्लॉक करण्याच्या या प्रक्रियेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो, असा याचिकाकर्त्याचा दावा आहे. मात्र, या आरोपांवर मेटा आणि केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणं बाकी आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील न्यायालयीन घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका
Rahul Gandhi Instagram Story: राहुल गांधींनी शेअर केला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा 'तो' व्हायरल फोटो; सोशल मीडियावर खळबळ