नाफा"फिल्म फेस्टिव्हल मध्ये पुण्याचा डंका
अथश्री ठुबे यांचा १० ते १२ वर्षांचा यशस्वी प्रवास
‘बटरस्कॉच’ या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार
अथश्री ठुबे यांनी केले आहे या लघुपटाचे संकलन
पुणे: नॉर्थ अमेरिकन असोसिएशनच्या वतीने अमेरिकेत ८ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या ३ऱ्या ‘नाफा’ (NAFA) चित्रपट महोत्सवात ‘बटरस्कॉच’ या लघुपटाने विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकत बाजी मारली आहे. ‘देऊळ’ चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या महोत्सवात यंदा शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये अथर्व खारकर फिल्म्स निर्मित आणि प्रफुल्ल खारकर दिग्दर्शित ‘बटरस्कॉच’ या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म (अमेरिका), बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सिनेमॅटोग्राफर आणि बेस्ट एडिटर असे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.
पुण्यातील तरुण संकलक अथश्री ठुबे यांनी या लघुपटाचे संकलन केले असून, त्यांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट संकलक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अथश्री ठुबे यांचा १० ते १२ वर्षांचा यशस्वी प्रवास
गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या अथश्री ठुबे यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे. ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटासह नेटफ्लिक्सच्या ‘ब्लू कोबाल्ट’ या ओरिजिनल चित्रपटासाठी ऑनलाईन एडिटर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ‘अभिमानास्पद महाराष्ट्र’ आणि ‘मीट द वर्ल्ड विथ एसकेएफ’ यांसारख्या उल्लेखनीय माहितीपटांचे संकलन त्यांनी केले आहे. आयसीआयसीआय बँक, लाईफ रिपब्लिक, इंदिरा युनिव्हर्सिटी आणि चितळे डेअरी यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या जाहिरातींचे संकलन त्यांनी केले आहे. ‘तेंडल्या’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे व्हिज्युअल प्रमोशन त्यांनी हाताळले असून, त्यांनी संकलित केलेल्या ‘सुतक’ आणि ‘लास्ट विश’ या लघुपटांनीही विविध महोत्सवांत ठसा उमटवला आहे.
चित्रपट क्षेत्रात ‘जेन झी’ (Gen Z) पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अथश्री ठुबे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या पुरस्कारामुळे पुढील कामासाठी नवी दिशा आणि हुरूप मिळाल्याची भावना व्यक्त केली. आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीत मोठे आणि दर्जेदार काम करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.