बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राष्ट्रीय समाज पक्षाच्या (Rashtriya Samaj Party) वतीने बारामती नगरपरिषद कार्यालयासमोर, जळोचीमध्ये कोविड १९ विरहीत पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करण्याबाबत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक प्रेताला अग्नी देऊन नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या मागणीची दखल घेऊन पर्यायी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पूर्वी जळोची ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती. २०१३ मध्ये जळोची ग्रामपंचायत बारामती शहरात समाविष्ट करण्यात आली. सुरुवातीपासून या गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी होती. मात्र, कोविड १९ या आजाराची सुरुवात झाल्यापासून कोरोनामुळे मयत झालेल्यांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. सध्याही बारामती शहरातील २ ते ४ कोरोनामुळे मयत झालेल्यांवर नगरपालिका प्रशासन जळोची स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, स्थानिक परिसरातील मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्याने इतर ठिकाणी अथवा शेतात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
मृतदेहाची हेळसांड मोठ्या प्रमाणावर होत आहे. या मागणीबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बारामती नगरपरिषदेने समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही, तर येथून पुढे जळोची गावातील मयत झालेल्या प्रेताचे नगरपरिषद कार्यालयासमोर त्या प्रेताला अग्नी देऊ असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संदीप चोपडे, तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर, चंद्रकात वाघमोडे, महादेव कोकरे, रेवण कोकरे, अविनाश मासाळ, किशोर सातकर, शैलेश थोरात, निखील दांगडे, सुधीर वाघमोडे, प्रमोद धायगुडे, निलेश सातकर, करण गोसावी, भूषण सातकर आदी उपस्थित होते.