Aditya Thackeray
पुणे : लाेकशाही टिकविण्यासाठी मतदानाचा अधिकार (Right to Vote) हा प्रत्येकाने बजावला पाहिजे. मतदार नाेंदणी करावी, अशी अपेक्षा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी येथे व्यक्त केली.
येरवडा येथील चिमा उद्यानात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंच ध्वजस्तंभाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत हाेते. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, युवा सेनेचे आदित्य शिराेडकर, नगरसेवक संजय भाेसले, ऍड. अविनाश साळवे, शिवसेनेचे नगरसेवक संजय माेरे आदी यावेळी उपस्थित हाेते.
‘‘ जेव्हा जेव्हा आपण तिरंग्याकडे पाहताे, तेव्हा गर्वाची भावना निर्माण हाेत असते. याेगायाेगाने आज शिवजयंती आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्य असा याेग या निमित्ताने जुळून आला आहे. ध्वज म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतिक असते. या झेंड्याची शान मान जपण्यासाठी आपण कर्तव्य बजावले पाहिजे. या ठिकाणी अनेक माजी सैनिक उपस्थित आहे. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्याच्या ७५ वे वर्ष साजरे करीत आहाेत.
तसेच प्रत्येकाने स्वातंत्र्य जपण्यासाठी काय करणार आहाेत ? याचे आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्याला लाेकशाहीने मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार लाेकशाही अबाधित ठेवण्यासाठी महत्वाचा आहे. या अधिकारानेच जनतेचा आवाज बुलंद हाेत असताे. हा अधिकार बजावला पाहिजे. त्याचप्रमाणे देशाच्या सेवेचाही विचार केला पाहिजे’’ अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरावा’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे इतर नेते यांच्यावर सातत्याने भाजपकडून आणि नारायण राणे यांच्याकडून आराेप केले जात आहे असे पत्रकारांनी विचारले असता, आदित्य ठाकरे यांनी या आराेपांना किती महत्व द्यायचे हे तुम्ही ठरवा, असे नमूद करीत उत्तर देणे टाळले.