सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : सासवड येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ व जोगेश्वरी देवाच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सव मूर्तींना अभिषेक घालून महापूजा झाली आहे. त्यानंतर मंदिरसमोर सामुदायिक सूर्यनमस्कार पार पडले. तसेच सासवडमधील सर्व देवांच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान केले. मंदिराचा कळस ते बगाडपर्यंत नवीन ध्वज बांधून माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते बगाडाची विधिवत पूजा केली. मंदिराचे पुजारी बापूसाहेब गिरीगोसावी यांना बगाडाचा मान दिला. त्यानंतर नारळ फोडून पाच प्रदक्षिणा घालून बगाड फिरवले. नाथ साहेबांचं चांगभलंच्या जयघोषात यात्रेस सुरुवात केली.
याप्रसंगी संजय जगताप, रमेश जगताप, पांडुरंग जगताप, अजय जगताप, नितीन भोंगळे, विठ्ठल शिंदे, बंडू जगताप, सुधाकर गिरमे, दामू जगताप, संजय चव्हाण, वैभव जगताप, चंद्रकांत गिरमे, दीपक जगताप, सखाराम लांडगे, बाजीराव इनामके, राजाभाऊ जगताप, रामभाऊ इनामके, जयसिंग जगताप, जितेंद्र जगताप, पांडुरंग भोसले, विलास जगताप, रामभाऊ भैरवकर, प्रवीण भोसले, प्रमोद बोरावके, तुषार जगताप, रवींद्रकुमार जगताप आदी उपस्थित होते.
कुस्त्यांचा जंगी आखाडा उत्साहात
सायंकाळी ७. वाजता उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ग्राम प्रदक्षिणा केली. त्यानंतर पहाटे ५ पर्यंत विविध भागातील ढोल आणि ताशा पथकांच्या छाबिण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये १५०० पासून तब्बल ५५ हजार रुपयेपर्यंत रोख पारितोषिके दिली. शनिवारी कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. यामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील मल्लांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामध्ये हजारो रुपयांची बक्षिसे दिली.
हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम
रविवारी सकाळी ८ पासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. रात्री सासवडमधील स्थानिक कलाकारांचा चैत्रोत्सव हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी रोजी पाव्हणं मी चीज लई कडक हा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंगळवारी दि. ७ रोजी संत तेल्या भुत्या कावडीच्या आगमनानिमित्त स्वागत सोहळा पार पडेल. बुधवारी दि. ८ रोजी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान सासवड शाखेच्या वतीने “द केरला स्टोरी” चित्रपट सासवड करांना दाखविण्यात येईल, अशी माहिती चैत्री उत्सव समितीने दिली.






