राजेगाव : ऊसतोड कामगारांच्या जीवनाचा संघर्ष खरोखरच जीवाला चटका लावणारा आहे. या कामगारांचे कोयत्यांचे सपासप वार ऊसाचे फड संपवत आहेत. मात्र, त्यांच्या साथीला असलेल्या चिमुकल्या हातांचाही संघर्ष काही कमी नाही. ऊस तोडणीचे काम स्थिर नसल्याने ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची होणारी फरफट अक्षरशः प्रत्येक मानवी मनाला विचार करायला लावणारी आहे. लहानग्या वयात हातात पाठ्यपुस्तके घेऊन शिक्षणाचे धडे गिरवण्याऐवजी हेच चिमुकले हात ऊस तोडणीसाठी आणि उसाच्या मोळ्या बांधण्यात व्यस्त असताना प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळतात.
ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा अयशस्वी प्रयोग अनेकांच्या डोळ्यांना दिसतो. पण देशाला महासत्ता बनविण्याची ताकद असलेल्या या मुलांना कुणीही शिक्षणासाठी मदतीचा हात देताना दिसत नाही. या चिमुरडयांसाठी विविध योजना राबवल्या जातात असे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ही मुले आपल्या जीवनात मरण यातना अनुभवत आहेत.
ऊसाच्या फडात मूलभूत सुविधांचा अभाव
ऊसाच्या फडात ना आरोग्य सुविधा, ना निवारा. तरीही आभाळाला छत समजून तिथेच जन्म घेणारी ही मुले देशाच्या दारिद्रयाचे दर्शन घडवताना दिसतात. अंगी कला, गुणवत्ता असलेली ही मुले शिक्षणाअभावी कायम अपवाद राहुन जातात. ऊसतोडीप्रमाणेच आपले हंगामी संसार चालवण्याच्या हट्टापाई या चिमुरड्यांचे संपुर्ण आयुष्य कवडीमोल होताना दिसते.
आंघोळीचा पत्ताही नाही
भल्यापहाटेच्या थंडीत अंगावर पुरेसे कपडे नसताना ही मुले ऊसाच्या फडात आपले भविष्य अजमावत आहेत. आपल्या आईबाबांप्रमाणे आपलेही आयुष्य उसाच्या फडातच जाणार का? असा भाबडा प्रश्नही त्यांना समजत नाही हे मोठे दूर्भाग्य!. पंधरा-पंधरा दिवस आंघोळ न करता आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार न करणाऱ्या या चिमुरड्यांच्या धाडसाला आणखी काय म्हणावे ?.
शासनस्तरावरून ठोस प्रयत्न हवेत
असे असले तरी या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शासनस्तरावरून मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे.त्यांना लागणाऱ्या सुविधा,कागदोपत्री पाठपुरावा अशा अनेक सहकार्यातून त्यांच्या जगण्यात आशेचा किरण नक्कीच निर्माण होईल हे मात्र खरे !
साखरसाळा म्हंजी काय रं भाऊ ?
ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ऊसतोडणीच्या भटक्या कामामुळे शिक्षणापासुन वंचित रहावे लागते. अशावेळी त्या भागात चालवल्या जाणाऱ्या हंगामी शाळांमधून मुलांना शिक्षण दिले जाते. पण ही साखरशाळा कुठेच अस्तित्वात नसल्याने साखरसाळा म्हंजी काय रं भाऊ ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. राजेगाव येथे सध्या असे चित्र पाहायला मिळत आहे .