फोटो सौजन्य - wikipedia
राज्यात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक आणि उड्डाणांवर देखील झाला. रायगडमध्ये रविवारी संध्याकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे किल्ले रायगडावर गेलेले सुमारे १०० पर्यटक या पाण्यात अकडले होते. पोलीस प्रशासनाने वेळीच सावधगिरी दाखवत या सर्व पर्यटकांना वाचवले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. किल्ले रायगडाच्या महादरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना गांभीर्याने घेत आता ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
३१ जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार रायगड पोलिसांनी किल्ल्याभोवती बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. तसेच परिसरात देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्गावर बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत कोणालाही रायगडावर जाण्याची परवानगी नाही, असे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. रायगड किल्ला परिसरात १५ पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत.
हवामान विभागाने आज देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज ९ जून रोजी सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी सावध राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.
कोकण, मुंबई, पालघर ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने आज मुंबई, उपनगर आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, कोल्हापूर व रायगड येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जुलै रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ व १२ जुलैला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.