Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च... तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
या आंदोलनाची दखल विधानसभा आणि विधान परिषदेत घेतल्यानंतर कालव्याच्या दुरुस्ती व नवीन कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, बारसोली येथील ड्रेनेज, सायफन आणि गळतीची कामे पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागली. मागील वर्षाच्या अखेरीस कालव्यातून पाणी सुरू झाले असले तरी संभे आणि पाले हद्दीतील कालवा अस्तरीकरणाची (लायनिंग) कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे सुमारे ३०% पाणी वाया जात असल्याचा दावा बळीराजा फाउंडेशनने केला आहे.
पाले गाव हद्दीसह अन्य ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही कालव्याची कामे अपूर्ण असल्याने संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच कालव्याला नियमित पाणी सोडण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही फाउंडेशनने केली आहे.
आंबेवाडी, संभे, पाले, महाबले पाले, बाकाडे पाले, वाशी, लांढर, बोरघर, निवि, निवि ठाकूरवाडी, निवि आदिवासीवाडी, भुवनेश्वर, तळाघर, कारिवणे, किल्ला, धाटाव, वरसगाव, बारसोली इत्यादी प्रमुख जवळपास २० गावांचा समावेश आहे.
ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर संबंधित सर्व अभियंता व अधिकाऱ्यांनी तातडीने संपर्क केला असून ३ दिवसांत कालव्याची साफसफाई सुरू होईल. लाइनिंग व दुरुस्ती कामे वेळेत पूर्ण करून पाणी हगामी डिसेंबरपर्यंत पूर्ववत होईल. – राकेश धाकतोडे, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग
आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीसाठी पाट बंधारे विभागाने आतापर्यंत करोडो रुपये खर्ची घातले आहेत. तरी देखील काही ठिकाणी कामे प्रलंबित आहे. प्रलंबित कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास या भागातील शेतकरी व बळीराजा फाऊंडेशन संघटना संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. पाणी आमच्या हक्काचा असून आमचे पाणी कोणी रोखणार नाही. – राजेंद्र जाधव, संस्थापक, बळीराजा फाऊंडेशन






