Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक व समाजसेवक किशोर धारिया यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा तसेच इतर मुलांप्रमाणेच त्यांनाही सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून मुक्तांगण शाळेत यंदाही दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी खास दहीहंडी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्यांनी एकमेकांना साथ देत मनोरे रचले आणि अखेर दहीहंडी फोडण्याचा आनंद अनुभवला. दहीहंडी फुटताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. गोविंदा गीतांचा ताल सुरू होताच विद्यार्थ्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त्त केला.
काही क्षणांसाठी शाळेचे प्रांगण पारंपरिक दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाने भारून गेले. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुलेही प्रत्येक आनंदाचा क्षण तितक्याच उत्साहाने साजरा करू शकतात, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. मुक्तांगण शाळेत अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनाची संधी मिळत नाही, तर त्यांच्यातील सामाजिक सहभाग, आत्मविश्वास आणि एकमेकांशी संवाद साधण्याची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे सण-उत्सवांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आनंदासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
या प्रसंगी मुक्तांगणच्या प्रिन्सिपल मंजुषा साबळे यांच्यासह श्रद्धा चोरगे, मयुरी कळमकर, ऐश्वर्या गायकवाड, सुयोग शिंदे, शैलजा घोटाळकर आणि अंकिता मोरे उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत या आनंदसोहळ्यात सहभाग घेतला. गोविदा गीतांवर धरलेला ताल आणि त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निरागस हास्य यामुळे मुक्तांगणच्या प्रांगणात रंगलेला यंदाचा दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान देऊन गेला.






